मुंबई । राजस्थानच्या 17 वर्षीय कल्पित वीरवालने इतिहास रचला आहे. आयआयटीतील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या संयुक्त प्रवेश परिक्षेत (जेईई) कल्पितने 360 पैकी 360 गुण मिळवले आहेत, असे यश संपादन करणारा कल्पित देशातील पहिलाच विद्यार्थी आहे. या यशामुळे देशभरात कल्पितच्या नावाची चर्चा होत असताना तो दलित असल्याचाही उल्लेख होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेच्या खासदार मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टीने ट्विट केले. कल्पितचे हे यश, दलितांमध्ये गुणवत्ता नाही असे म्हणणार्यांना एक सणसणीत चपराक आहे. कल्पित वीरवाल हा खुल्या आणि अनुसूचित जातीमध्ये अव्वल आला आहे,असे त्यात म्हटले आहे. कल्पितचे वडील पुष्करलाल वीरवाल उदयपूर येथील महाराणा भूपाल शासकीय रुग्णालयात कंपाऊंडर आहेत. त्याची आई पुष्पा वीरवाल सरकारी शाळेत शिक्षिका आहे. कल्पितचा मोठा भाऊ एम्समध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमात आहे.
देशातील आयआयटी, लोकसेवा आयोगाच्या परिक्शांमध्ये यापुर्वी उच्चवर्णीय विद्यार्थ्यांचा बोलबाला असायचा. पण आता त्यातही बदल घडायला लागले आहेत. 2015 च्या लोकसेवा आयोगाच्या परिक्शेत टीना डाबीने अव्वल स्थान मिळवले होते. ती ही दलित समुदायातील होती. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दलित असलेल्या भूषण अहीरने टॉप केले होते.
तो शिक्का बसलेला नाही
जेईई मेन्सच्या निकालात अव्वल आल्यावर कल्पित दलित असल्याचे बोलले गेले. यासंदर्भात कल्पितला विचारल्यावर तो म्हणाला, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास असल्यामुळे हे यश मिळवू शक लो. दलित असल्यामुळे अभ्यासात कधी अडसर आला नाही. माझ्या घरातही तसे वातावरण नाही. अभ्यासासंदर्भात मला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. मी दररोज पाच ते सहा तास अभ्यास करायचो. आता मी सारे लक्ष पुढील महिन्यात होणार्या जी अॅडव्हान्सवर केंद्रित केले आहे. भविष्याबाबत आताच काही विचार केला नसल्याचे कल्पितने यावेळी स्पष्ट केले. सध्या तो मुंबई आयआयटी कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेणार आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार का, या प्रश्नावर, इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावरच त्याबाबत विचार करणार, असे कल्पितने सांगितले.
ते विद्यार्थी आघाडीवर
देशातील महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपेक्षित समाजातील विद्यार्थी टॉप करत आहेत. देशातील दलित चळवळीतील अगे्रसर असलेले कांचा इलैय्या यांनी यांसदर्भात बोलताना सांगितले की, पुढील काळात उपेक्षित, दलित, ओबीसी विद्यार्थी इतरांना मागे टाकतील यात शंका नाही. इतर समुदायातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांमध्ये खोलात जाऊन अभ्यास करण्याचा जास्त दृष्टिकोन असतो. त्यामुळे संधी मिळाल्यास हे विद्यार्थी इतर समुदायातील विद्यार्थ्यांना मागे टाकत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे.