मुंबई: दलित शब्दाचा वापर कोठेही करण्यात येऊ नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शासन व प्रसार माध्यमांसह सर्वांना ‘दलित’ शब्दाचा उपयोग करण्यास मनाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पंकज मेश्राम यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानेही दलित शब्द वापरण्यास मनाई केली. दलित हा शब्द असंवैधानिक असून संविधानाचे निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हा शब्द वापरण्याला विरोध केला होता, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने दलित शब्दाचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या.