धुळे । नागरी दलीतवस्ती सुधार योजनेतील कामे करतांना नागरीकांच्या मुलभूत गरजा ओळखून कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ, नगरविकासच्या जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाठ, धुळे महापालीकेचे सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, शिरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, दोंडाईचा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक सावंत, साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मयुर पाटील, शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित निकस, टाऊन प्लॅनर संक्रांत कानडे, अभियंता कैलास शिंदे आदि उपस्थित होते.
अनावश्यक कामांवर खर्च न करण्याची सूचना
यावेळी पालकमंत्री श्री.भुसे यांनी शिरपूर नगरपरिषदेचे 3, दोंडाईचाचे 5, शिंदखेडा 3, साक्री 3 तर धुळे महानगरपालीकेचे 49 प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. पुढे बोलतांना ते म्हणाले, अनावश्यक कामांवर खर्च न करता पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छता व आरोग्याशी निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य देऊन कामे दर्जेदार होतील यावर विशेष भर देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविकातून नागरी दलीत वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.