दळवीनगर येथील स्थलांतरित शाळा अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त

0

पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये
सभागृह नेते एकनाथ पवार यांचे आवाहन

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत नियोजित पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे ही शाळा दळवीनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. या शाळेची इमारत अतिशय देखणी असून शाळेमध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी जागेचा अट्टहास न धरता दळवीनगर येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाठविणे गरजेचे आहे. दरम्यान, पालकांच्या सूचनांचा विचार केला जाईल. आणखीन आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये असे कळकळीचे आवाहन सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

पत्रकारांनी केली पाहणी
प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे. ही शाळा दळवीनगर परिसरात स्थलांतरित केली आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर इमारत बांधली आहे. परंतु, रेल्वे फाटक शेजारी असल्याने येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा ‘खडखडाट’ सुरु राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागणार नसल्याचे सांगत पालक आणि विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सभागृह नेते एकनाथ पवार यांच्यासह पत्रकारांनी आज (शुक्रवारी) नवीन शाळेची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक नामदेव ढाके उपस्थित होते.

केवळ 69 मुले शाळेत येतात
महात्मा फुले शाळेमध्ये 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शुक्रवारी (दि.15) शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु, दळवीनगर येथे शाळा सुरु केल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येत नाहीत. केवळ 69 मुले शाळेत येत आहेत. या मुलांना पालिकेने शालेय साहित्याचे वाटप देखील केले आहे. स्थलांतरित शाळेची इमारत अतिशय देखणी आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपब्ध आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. बसण्यासाठी बाके आहेत. तसेच मुलांच्या सुरक्षेची देखील काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पालक देखील आपल्या पाल्याला नवीन शाळेत पाठविण्यास इच्छुक आहेत. परंतु, काहीजण त्यांना दमबाजी करतात, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. या शाळेत थेरगाव, चिंचवड स्टेशन, आनंदननगर, वेताळनगर, वाल्हेकरवाडी, दळवीनगर या परिसरातील अधिक मुले शिक्षणासाठी येत आहेत. त्याचबरोबर चिखली येथून देखील काही मुले शिक्षणासाठी येतात. शाळेत चौथीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी निरभ डकाळ म्हणाला की, जुन्या शाळेपेक्षा ही शाळा चांगली आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.

पालकांच्या सुचनांचे स्वागत
सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, दळवीनगर येथील शाळेत अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान पालिका होऊ देणार नाही. आणखीन आवश्यक त्या सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन दिल्या जातील. पालकांनी सूचना कराव्यात. त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. परंतु, पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करु नये असे आवाहनही त्यांनी केले.