दळवीनगर शाळेत उपद्रवी तरुणांचा धुडगुस

0

मुख्याध्यापिकांना शिवीगाळ : खिडक्यांची तोडफोड, विद्यार्थी भयभीत

पिंपरी-चिंचवड : चिंचवडच्या दळवीनगर येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत स्थानिक उपद्रवी तरुणांच्या टोळक्याने बुधवारी (दि.28) दुपारी अडीचच्या सुमारास अचानक धुडगूस घातला. शाळा सुरु असताना त्यांनी दगड फेकून खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच शाळेत घुसून मुख्याध्यापिकांना शिवीगाळ केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. स्थानिक पोलिस अधिकार्‍यांचे या घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे.

विद्यार्थिनींची काढली जाते छेड

दळवीनगर येथे महापालिकेची ही शाळा भरत आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून अडीचशे विद्यार्थी आहेत. पुर्वी चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमध्ये ही शाळा भरत होती. मात्र, पोलिस आयुक्तालय कार्यालयासाठी शाळेचे इकडे स्थलांतर झाले. परंतू, याला पालकांनी विरोध दर्शविला होता. तरीही महापालिका प्रशासनाने विरोध डावलून स्थलांतरित केली आहे. 15 जूनपासून शाळा सुरु झाली. नंतर तेथील काही स्थानिक तरुण पाचवी-सहावीच्या मुलींसोबत छेडछाड करू लागले. शाळा सुटल्यानंतर सुरक्षारक्षकांस दमदाटी करुन इमारतीत दारु पिण्यास बसणे, जुगार खेळणे असेही प्रकार वाढले होते.

चिंचवड पोलिसांचे दुर्लक्ष

परंतू, बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक शाळेत तरुणांनी प्रवेश केला. तेथील मुख्याध्यापिकेला शिवीगाळ करुन दमदाटी केली. शाळेच्या खिडक्यांना दगड मारुन काचाही फोडण्यात आल्या. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दहशत माजविण्यासाठी शहरातील वाहनांची तोडफोड करताना हे लोण आता प्राथमिक शाळांना टार्गेट करु लागले आहेत. स्थानिक तरुणांना पोलिसांनी वेळीच आवर न घातल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही मुश्किल होणार आहे. त्यामुळे या घटनेकडे चिंचवड पोलिस अधिकार्‍यांनी लक्ष देवून कारवाईची मागणी पालकांतून होताना दिसत आहे