‘दशहरा दिवाली मेला’च्या माध्यमातून रोजगाराची संधी

0

जळगाव । अखिल भारतीय सिखवाल महिला मंडळ महाराष्ट्र प्रदेश ब्राह्मण संघातर्फे दशरा, दिवाळीच्या मूहुर्तावर ‘दशहरा दिवाली मेला’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘दशहरा दिवाली मेला’च्या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून रोजगारासाठी महिला प्रोत्साहीत झाल्या आहेत. सिखवाल महिला मंडळाने रोजगार उपलब्ध करुन देत महिला सक्षमीकरणास हातभार लावला असल्याचे गौरोद्गार आमदार सुरेश भोळे यांनी काढले. नंदीनीबाई बेंडाळे मुलींच्या महाविद्यालयाजवळील लेवा बोर्डींग सभागृहात सिखवाल प्रेरणा महिला मंडळातर्फे ‘दशहरा दिवाली मेला’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर ललित कोल्हे, मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंपकलाल कंढेई, महाराष्ट्र अध्यक्ष राधेशाम व्यास, भारती जोशी, रश्मी जोशी, सुशिल पांडे, कमला पांडे आदी उपस्थित होते.

खाद्य पदार्थांसह अनेक वस्तु विक्रीला
दशहरा, दिवाळीच्या मूहूर्त साधत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तीन दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार असून 17 सप्टेंबरपर्यंत विक्री सुरू राहणार आहे. या ठिकाणी खाद्य पदार्थासह, सौदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू, कापड विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी 50-60 स्टॉल लावण्यात आलेले आहेत. खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. महाविद्यालयीन तरुणींकडून प्रदर्शनातील वस्तूंची अधिक खरेदी होत असल्याचे याठिकाणी दिसून आले.

श्रावणबाळची गरज
आज प्रत्येक आईला वाटते की माझा मुलगा श्रावण बाळ सारखा झाला पाहिजे. मात्र आज श्रावण बाळ होण्यापेक्षा श्रावणबाळ सारखा पती होणे गरजेचे आहे. श्रावणबाळसारखा पती बनल्यास आपोआपच वृध्दाश्रम बंद होतील असे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. तसेच महिलांना पन्नास टक्के आरक्षण असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात पन्नास टक्के आरक्षण दाखवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सामुदायिक विवाहाची गरज
सिखवाल समाज हा मोठा समुदाय असून समाजातील तरुण, तरुणींसाठी विवाह ही मोठी समस्या बनली आहे. येत्या काळात सिखवाल महिला मंडळातर्फे सामुदायिक विवाहाचे आयोजन करणे गरजेचे असून ते झाले पाहिजे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. येत्या काळात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्यात येईल असे सांगण्यात आले. 17 सप्टेंबरपर्यंत सर्वंसाठी दसरा-दिवाळी मेळावा सुरू राहणार आहे.