दसॉल्ट कंपनी ही मोदींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे – राहुल गांधी

0

नवी दिल्ली : राफेल खरेदी करारावरून मोदी सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. दसॉल्ट कंपनी ही मोदींना वाचवण्याचा प्रयत्न करत असून या प्रकरणाची चौकशी झाली तर मोदी त्यात अडकतील. आपण पकडले जाऊ याच भीतीनं मोदींची रात्रीची झोप उडाली आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

राहुल गांधींनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मोदी सरकारवर निशाना साधला. दसॉल्टनं अनिल अंबानींच्या कंपनीला २८४ कोटी रुपये दिले. या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केली. अंबानींकडे जमीन होती. त्यामुळंच त्यांच्या कंपनीला काम मिळालं, असं आता दसॉल्टचे सीईओ सांगत आहेत, असं राहुल म्हणाले. कोणतंही काम न करणाऱ्या आणि तोट्यात असलेल्या कंपनीत दसॉल्टनं गुंतवणूक का केली, असा सवाल उपस्थित करत घोटाळ्याचा हा पहिला हप्ता होता, असा आरोप राहुल यांनी केला आहे.

…तर नरेंद्र मोदी गप्प का?

राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं जगजाहीर झालंय. यात अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी या दोघांची भागीदारी आहे. मोदींचा यात सहभाग नसता तर त्यांनी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशी करण्यास सांगितलं असतं. पण ‘चौकीदार’ गप्प बसले आहेत, असंही राहुल म्हणाले.