‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम’चे लोकार्पण आणि ‘वर्ल्ड पार्लमेंट’चे उद्घाटन
पुणे : भारतीय संस्कृतीने जगाला ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्वज्ञान दिले. विश्वशांतीसाठी बाह्यशांतीपेक्षा आत्मिक शांतीचे महत्त्व नव्या पिढीला देण्याचे काम या घुमटाद्वारे होईल. जगात दहशतवादी आणि अशांततेच वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सर्वांना शांतीची गरज आहे. मानवसेवा हीच खरी माधवसेवा असल्याचा आदर्श घुमटातील 54 पुतळ्यांनी आपल्या कार्यातून जगासमोर ठेवले आहे. जागतिक संस्कृतीचे श्रेष्ठत्व या अशाच विचारात आहे. घुमटाद्वारे वैश्विक संदेश निर्धारित करत जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याचे काम घुमटाद्वारे होईल, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अॅन्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग यांच्यातर्फे म. गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षाचे निमित्ताने जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या वास्तूमधील तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाचा लोकार्पण आणि विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित ‘जागतिक परिषदेचे’ उद्घाटन उपराष्ट्रती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वर्ल्ड पीस डोम.कॉम या संकेतस्थळाचेही अनावरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर मुक्ता टिळक, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, प्रा. राहुल कराड, प्रा.डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.
भारतीय परंपरेचे सुंदर दर्शन
नायडू म्हणाले, डॉ. विश्वनाथ कराड यांना आध्यात्मिक संस्कार मिळाले. या संस्कारातून त्यांनी जगातील सर्वात मोठी कलाकृती स्थापित करून जगाला सोपवली. जगातील एक आश्चर्य म्हणून हे प्रार्थना सभागृह नावारुपाला येईल. सांस्कृतिक वारसा आणि मानव कल्याणाचा शांतीचा संदेश, नवविचारांची कल्पना आणि भारतीय परंपरेचे सुंदर दर्शन या ठिकाणी घडेल. जगातील हिंसेचा सामना हिंसेने नाही, तर अहिंसेने करता येईल. माता, मातृभूमी, मातृभाषा, गुरू आणि देश यांचा सन्मान सर्वांनी करावा.
जगाला मानवतेचा संदेश
फडणवीस म्हणाले, डॉ. विश्वनाथ कराड यांनी मानव कल्याणासाठी हा घुमट उभारला आहे. ही जगातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नावारुपाला येईल. महात्मा गांधी व संत ज्ञानेश्वर यांच्याच नावाने जगातील सर्वात मोठ्या घुमटात प्रार्थना सभागृह निर्मिती करण्यात आली, तो जगाला मानवतेचा आणि विश्वशांतीचा संदेश देत राहील.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, घुमट भविष्यात भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा प्रतिक म्हणून नावारुपाला येईल. भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांना जगात शांतीचा दूत म्हणून ओळखले जाते.
डॉ. माशेलकर म्हणाले, जगाला वेगळी कल्पना आणि मानवकल्याणाचा संदेश या गोल घुमटाकार वास्तूच्या माध्यमातून दिला जात आहे. मानवतेच्या अंर्त:मनात शांतीचा नवा मार्ग व विकासाची दिशा देण्याचे काम घुमटाद्वारे होईल.
मानवकल्याण आणि शांतीचे मंदिर
डॉ. विजय भटकर म्हणाले, हा घुमट मानवकल्याण आणि शांतीचे मंदिर आहे. याठिकाणी विज्ञान आणि अध्यात्माचा संगम आहे. 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वराने हे ’विश्वची माझे घर’ हा संदेश संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दिला होता.
प्रा. राहुल कराड म्हणाले, हा घुमट राष्ट्रीय नसून संपूर्ण विश्वाचा आहे. ज्या प्रकार घुमटाद्वारे शांतीचा संदेश दिला जाईल, तसेच भविष्यात जगातील पर्यटन स्थळ म्हणूनही उदयास येईल.