दहशतवादाविरोधात जळगावकर रस्त्यावर

0

जळगाव। दहशवादाचा नायनाट करण्यासाठी जळगावकर हजारोच्या संख्येने रविवारी 21 मे रोजी रस्त्यावर उतरून आले. शांततेच्या मार्गाने कुठलीही घोषणा व गाजावाजा न करता शिस्तप्रिय जळगावकर नागरिकांचे राष्ट्राप्रती असलेली तळमळ आणि दहशतवादाच्या विरोधात असलेला प्रचंड संताप मूक रॅली मधून व्यक्त करण्यात आला. स्वामी विवेकानंद बहुद्देशिय मंडळ तसेच युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे दहशतवादविरोधी दिनानिमित्त दहशतवाद विरोधी नागरी शक्तीची मुक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शनिपेठेतली महर्षी दधिची चौकातून सकाळी 10.15 वाजता दहशतवाद निषेध मुक्त रॅलीला सुरूवात करण्यात आली. रॅलीत सहभागी नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक, स्वयंसेवी संघटना व संस्थांचे सदस्य, लोकप्रतिनिधी,जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी यांनी हाताला काळ्या फिती लावून दहशतवादाचा निषेध नोंदविला. मूक रॅली सुरु असताना अनेक परिसरामधून नागरिक सहभागी होत होते. दहशतवादाच्या विरोधात संदेश देणारे फलक रॅलीत लक्षवेधून घेत होते. रा.स्व,संघाच्या प्रेरणेने आयोजित उपक्रमात जळगावकरांच्या जागृत देशभक्तीच्या प्रेमाचे दर्शन झाले.

हिंदुस्थानाला मानणारे प्रामाणिक मुस्लीम
दहशतवाद विरोधात निघालेल्या मुक रॅलीत सर्व जातीधर्माचे धर्मगुरु यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, जैन आदी समाजातील मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविली. विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या मुक रॅलीचे प्रथमच अशा प्रकारे आयोजन करण्यात आल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी सभेत संबोधित करतांना भारत हा देश सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालणारा देश असून, देशात सुमारे हजारो जातींचे लोक अतिशय आनंदाने नांदत आहे. जगातील इतर देशाच्या तुलनेत भारत महान आहे आपल्या भारत देशाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. परंतू जो मुस्लिम देशाला मानत नाही तो हिंदूस्तानी नसून तो सच्चा मुस्लिम देखील नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
विवेकानंद बहुद्देशिय मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दहशतवाद विरोधी दिन साजरा करणे जागतिक स्तरावरचा विषय आहे. परंतू तो कुठेही साजरा होत नसल्याचे दुर्देव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतू आज आज काढण्यात आलेल्या रॅलीत जळगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने हिच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महापौर नितीन लढा यांनी भारतालाच नव्हे तर संपुर्ण जगाला दहशतवादाचाला सामोरे जावे लागत आहे. दहशतवादी हल्ल्यांमुळे निष्पाप नागरीकांचे बळी जात असतात. त्यामुळे सर्व समाजांत त्याबद्दल चिड निर्माण होत असते. दहशतवाद मुळासकट संपावायचा असेल तर सर्व नागरीकांनी दहशवादाला सामोरे गेल्यास दहशवाद ठगा ठरू शकरणार नसल्याचे त्यांनी सांगीतले.

शहीदांना श्रद्धांजली
खान्देश सेन्ट्रलच्या प्रांगणात रॅलीचे रूपांतर संकल्पसभेत करण्यात आले.प्रमुख मान्यवरांच्या हातून दहशतवादाच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. देशभरात विविध शहरातून झालेल्या दहशतवादी व नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा ठरलेल्या सैनिकांना, शहीद झालेल्या पोलिसांना तसेच नागरिकांची आठवण म्हणून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक कैलास सोनवणे, युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललीत कोल्हे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दीपक घाणेकर, अनिल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. संजय शेखावत, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके, सिद्धांत बाफना, मनोहर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. दहशतवादविरोधी शपथ व प्रतिज्ञाग्रहण करण्यात येईल. राष्ट्रगीताने या संकल्पसभेचा समारोप होईल.

दहशतवाद हा आजार
दहशतवाद हा जगातील देशाला लागलेला आंतराष्ट्रीय स्वरुपाचा आजार असून तो दहशतवाद्यांच्या मनात खोलवर रुजला आहे. या आजावर मात करण्यासाठी एकत्र येवून त्याचा मुळा सकट नाश करणे गरजेचे आहे. दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्यांना फक्त श्रद्धांजली वाहून चालणार नाही एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. शहिदांना मूक मोर्चातूनच श्रद्धांजली मिळाली असल्याचे मनोगत केशव स्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी व्यक्त केले.

सर्वस्तरातील नागरिकांचा सहभाग
दहशतवादी संघटनांकडून देशाला असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभुमीवर रा.स्व. संघसंचलित राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मार्गदर्शनाने दहशतवाद विरोधी दिनाचा उपक्रम राबविण्यात आला. विविध व्यावसायिक, सामाजिक तसेच क्रीडा संघटनांनी आपला सहभाग या रॅलीत नोंदविलेला होता, सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच नागरिकांनी व शासकीय तसेच निमशासकीय व स्वायत्त संस्था आस्थापनांतील सदस्यांनीही रॅलीत सहभाग घेतला होता.