मुंबई । पाकिस्तानातूनदहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन मुंबईत परतलेल्या एका दहशतवाद्याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. या दहशतवाद्याचा मुंबईतल्या संवेदनशील, अतिमहत्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट होता, असे एटीएसकडून सांगण्यात आले. एटीएसने पत्रकाद्वारे याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. एटीएसच्या माहितीनुसार, मुंबईतील एक 32 वर्षीय तरुण पाकिस्तानातून दहशतावादी संघटनांच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेऊन नुकताच मुंबईत परतल्याचे जुहू युनिटच्या खबर्यांकडून 11 मे 2018 रोजी माहिती मिळाली होती. त्यानुसार, एटीएसने या दहशतवाद्याला 11 मे रोजीच ताब्यात घेतले होते.
एटीएसने पकडलेल्या दहशतवाद्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका बॉम्बस्फोट प्रकरणातील पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीने या तरुणाला संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर येथे काही दिवस राहिल्यानंतर त्याला दुबईमार्गे पाकिस्तानच्या कराची येथे पाठविण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आली. येथे या तरुणाला काही दिवस शस्त्र चालवणे, बॉम्ब बनवणे, आत्मघाती हल्ले करणे, आग लावणे अशा घातक कृत्यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
21 मे पर्यंत पोलिस कोठडी
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने इतर वॉन्टेड आरोपींशी संगनमताने मुंबईतील अतिमहत्वाच्या व्यक्ती, वर्दळीची ठिकाणे आणि अत्यावश्यक सेवा पुरवणार्या संस्थांवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखली होती. मात्र, हल्ल्यांची ठिकाणे, व्यक्तींची माहिती एटीएसने उघड केलेली नाही. कोलकाता एटीएस, मुंबई पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र एटीएसने हा कट उघडकीस आणला. पकडलेल्या दहशतवाद्याला कोर्टात हजर केल्यानंतर 21 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.