नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पुरवण्यात येणार्या आर्थिक रसदीच्या रॅकेटसंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी मोठी कारवाई केली. यावेळी एनआयएकडून काश्मीरमधील 14 आणि दिल्लीतील आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये हवाला ऑपरेटर्स आणि फुटीरतावाद्यांच्या घरांचा समावेश आहे. सध्या या सगळ्याची प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली.
शनिवारी दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमधील वेगवेगळ्या 23 ठिकाणी टाकलेल्या छापेमारीत लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांचे लेटरहेड तसंच पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉप सापडले आहेत. एनआयएने छापेमारीदरम्यान माहिती मिळालेल्या ठिकाणांवरही धाडी टाकल्या आहेत. ज्यांच्यावर छापेमारी करण्यात आली त्यांच्यामध्ये कट्टर फुटीरवादी नेता सैय्यद अली शाह गिलानी यांचा जावई फंटूश, व्यापारी जहूर वाटाली आणि आवामी अॅक्शन पार्टीचे नेता शाहिद-उल-इस्लाम यांच्याशिवाय इतर फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून हिजबुल मुजाहिद्दीन आणि लश्कर ए तोयबाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले होते. यावेळी सुरक्षा दलांनी ‘लष्कर’च्या पाच हस्तकांना आणि हिजबुलच्या एका हस्तकाला अटक केली होती. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांना एका कारमध्ये शस्त्रास्त्रे सापडली. पोलिसांनी गाडीतील पाच संशयितांची चौकशी केली असता त्यांनी लश्कर ए तोयबासाठी काम करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी कारमधून हँड ग्रॅनेड, एके रायफलच्या दोन मॅगझिन, 27 एके राऊंड्स असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली होती. ‘लष्कर’च्या हस्तकांना पकडल्याची घटना ताजी असतानाच मणिगाम भागातून पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनसाठी काम करणार्या सुहैब अहमद भटला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांना एक पिस्तूल आणि 8 राऊंड्स जप्त करण्यात आले. सुहैब हा पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामधील रहिवासी आहे.
कागदपत्रांची तपासणी
काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत एकूण 1.5 कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. काश्मीर खोर्यात 1990मध्ये दहशतवादाने तोंड वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने दहशतवादी फंडिंगसंबंधी छापेमारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पैशांचा वापर खोर्यात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे, याआधी 2002 रोजी आयकर विभागाने गिलानी यांच्यासहित इतर फुटीरतावादी नेत्यांची चौकशी केली होती. यावेळी काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली होती. त्यावेळी कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. एनआयएने 29 मे रोजी तहरीक-ए-हुर्रियतचे फारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, नईम खान आणि जावेद अहमद बाबा उर्फ गाजी यांचीही चौकशी केली होती.