शिरपूर । शिरपूर शहरातील शाळा, कॉलेज परिसरात गुंडगिरी व दहशत पसरवण्याच्या घटनेचा सर्व स्तरावर जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधीत गावगुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातर्फे प्रशासनाला निवेदन देवून मागणी करण्यात आली. निवेदनात अनेक मुद्यांचा उल्लेख करण्यात आला असून पोलीस प्रशासनासह सर्व संबंधीत अधिकारी यांनी कडक करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांनी हुज्जत घालून बेशिस्तपणाचा गाठला होता कळस
निवेदन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आर.वाय.शेख, तहसिलदार महेश शेलार, पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांना देण्यात येवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर शहादा रस्त्यापासून जवळच असलेल्या शास्त्री नगर मधील प्लॉट नं. 35 येथे आर.सी.पटेल आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील यांची मारुती सुझुकी सियाझ कार अज्ञात समाज कंटकांनी पेटवून दिल्याची भयानक घटना घडली.गेल्या 14 वर्षांपासून येथे वास्तव्य असून राहत्या बंगल्याच्या अंगणात उभी केलेल्या एम.एच.-18 एजे 5661 क्रमांकाच्याकार वर पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिल्याची ही घटना अतिशय चीड निर्माण करणारी आहे. दुस-या घटनेत गेल्या वर्षी सायन्स कॉलेजमध्ये कॉपी करु न देण्याच्या कारणावरुन काही विद्यार्थ्यांनी हुज्जत घालून बेशिस्तपणाचा कळस गाठला होता. तसेच एका प्राध्यापकाला घरी जावून शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आर.सी.पटेल सायन्स कॉलेज व फार्मसी कॅम्पस मध्ये मोठयाने भोंगे वाजवून मोटारसायकली भरधाव वेगाने नेण्याचे प्रकार अनेकदा घडतात,असे निवेदनात म्हटले आहे.