राजकारणातील घराणेशाही भारतातील सर्वांत मोठी समस्या
इतिहासाच्या पुस्तकात राज्यशास्त्राचा समावेश
पुणे : बालभारतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये म्युच्युअल फंडस, शेअर बाजार, जीएसटी, अवयवदान या नवीन विषयांचा अंतर्भाव केला आहे. तसेच स्वाती महाडिक या वीरांगणेचीही माहिती दिली आहे. अशा विषयांना प्राधान्य देत असतानाच सत्ताधार्यांनी पाठ्यपुस्तकातूनही मन की बात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे गुणगान केले असून, अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पक्षावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्ताधार्यांच्या मानसिकतेवर आता टीका होऊ लागली आहे.
राजकारणासाठी पाठ्यपुस्तकांचाही आधार
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने नवीन पाठ्यपुस्तके तयार केली असून, या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पाठ्यपुस्तकांचा स्वत:चे गुणगान गाण्यासाठी वापर केल्याचे उघड झाल्याने सत्ताधार्यांबाबत विविध प्रतिक्रिया उमटू लागलया आहे. यंदा दहावीसाठी राज्यशास्त्र या विषयाचा प्रथमच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये राजकीय सद्यस्थिती, तसेच काही पक्षांबाबतचे उल्लेख आक्षेपार्ह आहेत. काही उल्लेखांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून, प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे, असा उल्लेख केला आहे. तर चीन की सोव्हिएत युनियन यापैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे, यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभेद झाले. त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) स्थापन झाला, अशी माहितीही राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे. याशिवाय, काही प्रादेशिक पक्षांची माहिती, तसेच राज्यातील सध्याचे राजकीय बलाबल याची माहितीही या पुस्तकात आहे.
काँग्रेसबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
घराणेशाहीवरून काँग्रेसकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आल्याचे दिसते. शिवाय, विद्यार्थ्यांच्या मनात विशिष्ट पक्षाबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांनी केल्याचे दिसून येते. राजकारणातील घराणेशाही ही भारतातील लोकशाहीसमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्याने लोकशाही संकुचित होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होता येत नाही. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांना यावर विचार करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्ता मिळवतात. परंतु, राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत निवडणुका होतात का? राजकीय पक्षांनी अंतर्गत निवडणुका घेणे आवश्यक असते. परंतु, अशा निवडणुका होतात का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काही पक्षांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे मात्र, गुणगान या पाठ्यपुस्तकात करण्यात आले आहे. शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे, असा उल्लेख शिवसेनेचा करण्यात आला आहे.