दहावीत नापास झाल्याने नांद्रा येथे विद्यार्थ्याची आत्महत्या

0

जळगाव। इंग्रजी व गणित या दोन विषयात नापास झाल्याने चेतन रमेश पाटील या सोळा वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तालुक्यातील नांद्रा येथे घडली. दरम्यान, चेतन हा नांद्रा येथील श्री दत्त हायस्कुलचा विद्यार्थी होता. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दहावी परिक्षेचा मंगळवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांचे मित्र गावातील एका रसवंतीजवळ बसलेले होते. तेथे चेतन हा देखील त्यांच्यामध्ये बसलेला होता. सर्वांनी मोबाईलवर ऑनलाईन निकाल पाहिला असता त्यात अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर यानंतर मित्राच्या मोबाईलमध्ये चेतन याने त्याचा निकाल पाहिला असता त्यात तो इंग्रजी व गणित हे दोन विषय नापास झाल्याचे त्याला दिसले.

निकाल पाहिल्यानंतर चेतन हा मित्रांजवळून उठून थेट घरी गेला. वडील जळगावात कामानिमित्त तर आई लहान भाऊ बंटी याला घेण्यासाठी धुळे येथे गेलेली होती, त्यामुळे घरी कोणीच नव्हते. घरात साडीच्या कपड्याने त्याने गळफास घेतला. सोबत असलेला एक मित्र त्याला लागलीच पाहण्यासाठी आला असता घराचा दरवाजा उघडा तर चेतन याने गळफास घेतला होता त्या मित्राने त्याला तत्काळ खाली उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून शक्य न झाल्याने त्याने साडी तोडली परंतु तीही अर्धवटच तुटली. त्याने अन्य मित्रांना बोलावून त्याला खाली उतरविले.

डॉक्टरांनी केले मृत घोषित
पायाला झटके येत असल्याने गावातील डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आले. त्यांनी त्याची तपासणी करुन जळगावला नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडीलांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. नातेवाईक व गावातील लोकांनी त्यांना धीर दिला. दरम्यान, चेतन याचे आई, वडील हातमजुरी करतात तर तो देखीला वडीलांना शेती कामात मदत करायचा.लहान मुलगा ललित हा सातवीच्या वर्गाला आहे. दरम्यान, दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात चेनच्या मित्रांनी देखील एकच गर्दी केली होती. तर चेतनच्या वडीलांच्या डोळयातून अश्रू धारानिघत होत्या.