पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमामुळे यंदा इंग्रजी आणि गणित या विषयांसाठी बहुसंच प्रश्नपत्रिकांऐवजी एकच कृतिपत्रिका पुरवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील परिपत्रक मंडळाने जारी केले. त्याची अंमलबजावणी मार्च, 2019पासून होईल.
दहावीच्या परीक्षेत दरवर्षी गैरप्रकार होत असत. ते रोखण्यासाठी मंडळाने गणित व इंग्रजी विषयांसाठी अ, ब, क, ड अशी बहुसंच प्रश्नपत्रिकापद्धत अंमलात आणली होती. मात्र, यंदा अभ्यासक्रम बदलल्यामुळे या दोन्ही विषयांसाठी एकच कृतिपत्रिका असेल. हा अभ्यासक्रम कृतिशील व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे. त्यामुळे कॉपीकेसेस व अन्य गैरप्रकार होणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत राज्य मंडळाने अभ्यासक्रमातील ज्ञानरचनावाद परीक्षेतही आणण्यासाठी बदल केला आहे. केवळ जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणार्यांनाच बहुसंची प्रश्नपत्रिकापद्धत लागू असेल.
आकलन व उपयोजनांवर भर
अभ्यास मंडळ सदस्यांच्या अभिप्रायानंतर हा बदल करण्यात आला. बदललेल्या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या आकलन व उपयोजनांवर भर आहे. विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकांमध्ये स्वत:ची मते मांडावी लागणार आहेत. परीक्षेत पाठांतरावर आधारित प्रश्नच विचारले जाणार नसल्याने प्रश्नांची पुनरावृत्ती होणार नाही, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ