दहावी, बारावी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये: डॉ. शकुंतला काळे

0

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावी, बारावीचा निकाल कधी लागेल या संदर्भात बऱ्याच अफवा पसरत आहे. तसेच निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला लागतात. परंतु निकाल यंदा लॉकडाउनमध्ये अडकले आहे.या पसरणाऱ्या अफवाबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अद्याप निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा दहावी – बारावीचा निकाल जाहीर करता आलेला नाही. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. यंदा सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.