अविनाश धर्माधिकारी करणार मार्गदर्शन
पिंपरी : दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे? याबाबत पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात. अशावेळी पिंपरी-चिंचवडमधील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन व्हावेयासाठी जिजाई प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध करिअर व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आणि चाणक्य मंडळाचे संचालक डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुलेनाट्यगृहात रविवारी सकाळी दहा वाजता ते मार्गदर्शन करतील. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीसभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे, भाजपच्या प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित असतील.
करिअरसाठी स्वतंत्र संधी उपलब्ध
दहावी आणि बारावीनंतर अभियांत्रिकी व मेडिकलसोबतच इतर अनेक विद्याशाखांमध्ये करिअर करण्याची स्वतंत्र संधी उपलब्ध आहेत. या उपलब्ध संधींना स्पर्धा परीक्षांची जोड देऊन विद्यार्थी जीवनाचे ध्येय अधिक व्यापक कसे करू शकतात, आपण निवडलेला करिअर पर्याय आणि स्पर्धा परीक्षा यांची सांगड कशी घालावी, स्वतःमधील क्षमतांचा उपयोग, स्वनियोजन, वेळेचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर यावेळी डॉ. अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. करिअर वाटांसोबतच आधुनिक व्यावसायिक परिघात आवश्यक असणारी कौशल्ये, अतिरिक्त गुण आणि महत्त्वाच्या बाबींवर यावेळी प्रकाश टाकण्यात येईल. हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी 9175372313 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.