दहा दिवसात पेट्रोल १ रुपयांनी स्वस्त

0

मुंबई : पेट्रोल – डिझेलच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून बदल पाहायला मिळत आहे. उच्चांक गाठलेल्या या दरांनी अखेर सामान्यांना थोडा दिलासा देण्याचा विचार केला आहे. गेल्या १० दिवसांत सतत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात पाहायला मिळालेली आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात २१ पैसे प्रती लीटर आणि डिझेलमध्ये १५ पैसे प्रती लीटर कपात पाहायला मिळत आहे. गेल्या १० दिवसात पेट्रोल १ रुपया आणि डिझेल ७३ पैसे प्रती लीटर स्वस्त झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दरातील ही सर्वात मोठी घट असल्याचे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घट पाहायला मिळाली आणि याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल दरात पाहायला मिळाली. या झालेल्या घटानंतर चार महानगरात याचा परिणाम पाहायला मिळाला. दिल्लीत सध्या पेट्रोल स्वस्त दरात आहे. २९ मेमध्ये पेट्रोल दिल्लीत सर्वाधिक ७८.४३ रुपये इतके होते तर आता ते ७७.४२ रुपये इतके झाले आहे.