बोदवड । सध्या दहा रुपयांचे नाणे बाजारात घेऊन जाणे हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी अडचणीचे ठरत आहे. डिझेल भरुन त्यांची नाण्यांचा स्विकारण्यास मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंप चालकाने स्विकारण्यास नकार दिला आहे. स्टेट बँक या नाण्यांचा भरणा घेत नसल्याचे कारण त्यांच्याकडून देण्यात आले. यामुळे मात्र ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असून यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी केली आहे.
डिझेल भरण्यास नाणी दिली असता कर्मचार्याचा नकार
बोदवड तालुक्यातील आमदगाव येथील रहिवासी चेतन पाटील हे आपल्या चारचाकी वाहनाने मुक्ताईनगर येथे गेले असता व्ही.एम. महाजन यांच्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर एक हजार रुपयांचे डिझेल भरले. या बिलाची रक्कम देतांना त्यांनी सेंट्रल बँकेतून काढलेले दहा रुपयांच्या नाण्यांची चिल्लर रक्कम दिली. मात्र संबंधित पेट्रोल पंप कर्मचार्यांनी हे नाणे स्विकारण्यास नकार दिला.
संभ्रमाची स्थिती
मात्र चेतन पाटील यांनी आग्रह केला असता मालकाकडून दहा रुपयांची नाणी स्विकारत नसल्याचे सांगितले. यामुळे पंपावरील कर्मचारी व पाटील यांच्यात वाद झाल्यानंतर पंपमालकाने लेखी लिहून दिले. त्यामुळे नाईलाजास्तव पाटील यांना मित्राकडून हजार रुपये उधार घेवून बिलाची रक्कम दिली. याप्रकरणी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन नाणे न स्विकारणार्यांवर कायदेशिर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान असे प्रकार अनेक ग्राहकांसह होत असून दुकानदार देखील दहा रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
स्टेट बँकेत आजपर्यंत दहा रुपयांच्या नाण्यांची 40 हजार रुपयांची चिल्लर माझ्या खात्यावर जमा झाली आहे. आमच्याकडून एकही ग्राहक दहा रुपयाचे नाणे स्विकारत नाही. तसेच स्टेट बँक देखील हे नाणे घेत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. पर्यायाने आम्हीही ग्राहकांकडून नाणे स्विकारण्यास नकार दिला आहे.
– व्ही.एन. महाजन, पेट्रोल पंपमालक, मुक्ताईनगर