दहिगावातील प्रौढाला पंधरांव्या सर्पदंश
पंधरा दिवसात दुसर्यांदा चावा ः सातत्याने सर्पदंश होण्याची कारणे समोर येण्याची मागणी
भुसावळ : साप नुसते नाव म्हटले तरी अनेकांची भंबेरी वळते मात्र यावल तालुक्यातील 42 वर्षीय प्रौढाला एक-दोनदा नव्हे तर तब्बल पंधरा वेळा सर्पाने चावा घेतला आहे शिवाय वेळीच झालेल्या उपचारामुळे त्यांचे प्राणही वाचवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. सातत्याने याच प्रौढाला साप का दंश करीत असावा? हे न उलगडणारे कोडे आहे. या प्रकारामुळे कुटूंबाला देखील चांगलाच मनस्ताप सोसावा लागत आहे.
पंधराव्यांदा झाला सर्पदश
दहिगाव, ता.यावल येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (42) हे गुरूवारी लघूशंकेसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहात गेले असता त्यांच्या उजव्या पायाला सापाने चावा घेतला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, अधिपरीचारिका ज्योत्ना निंबाळकर, अधिपरीचारिका दीपाली किरंगे, सुमन राऊत आदींनी त्यांच्यावर उपचार केले .सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी 22 जून रोजी त्यांना 14 व्यांदा सर्पदंश झाला होता व पंधरा दिवसात पुन्हा दुसर्यांदा सापाने चावा घेतला. गणेश मिस्तरी यांना वारंवार सर्पदंश होत असल्याने त्यांचे कुटुंब पुरते हैराण झाले आहे.
आतापर्यंत 15 वेळा सर्पदंश
7 डिसेंबर 2016 केळीच्या बागेत
17 एप्रिल 2017 घराजवळील लाकूड उचलतांना
12 मे 2017 घरा बाहेरील सफाई करतांना
25 मे 2017 शौचास जातांना
14 जुन 2017 घरा बाहेरील माठातुन पाणी पितांना
26 ऑगस्ट 2017 घरा बाहेरी लाकूड उचलतांना
14 सप्टेंबर 2017 केळी बागात शौचास जातांना
19 सप्टेंबर 2017 घराच्या बाहेर
28 सप्टेंबर 2017 घरातील बाथरूमजवळ
12 ऑक्टोंबर 2017 घराबाहेर काम करतांना
27 ऑक्टोंबर 2017 घरात बाहेर साफसफाई करतांना
22 डिसेंबर 2021 गावातील पटेल वाड्यात काम करतांना
25 मे 2022 गावातील मागसवर्गीय वस्तीत काम करतांना.
22 जुन 2022 दहिगावात मुतारीजवळ
07 जुलै 2022 दहिगावात मुतारीजवळ