दहिवेलच्या आदिवासी तरूणास मारहाण

0

साक्री । तालुक्यातील बोदगाव येथील येथील एका आदिवासी तरूणास दहिवेल येथे घरात कोंबून एका पोलीस कर्मचारी व दोन इतर जणांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. तरूणाच्या बापाने दिलेल्या तक्रारीकडे पोलीसांनी मुद्दाम टाळाटाळ केल्यामुळे साक्री येथील आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी संबधीतांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी सायंकाळी 7 वाजेपासुन राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आदोंलन केले होते. तसेच आ.डी.एस.अहिरे यांनी खुद्द पोलीस अधिक्षक एस चैतन्या यांना भेट देऊन सदर प्रकार सांगीतल्यावर साक्री पोलीसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र ज्या तरूणास मारहाण झाली तो अद्याप घरी परतला नसून त्याला परत आणावे व तिसर्‍या आरोपीस अटक करावी या मागणीला धरूण मंगळवारी पुन्हा दहिवेल येथे रास्ता रोको व तुफान दगडफेक करून आंदोलन करण्यात आले.

गुन्हा नोंदविण्यासाठी रास्ता रोको
तालुक्यातील दहिवेल येथील कन्हैयालाल ब्रिजलाल ठाकरे 20 या आदिवासी तरूणास पोलीस कर्मचारी सुनिल प्रल्हाद कोतवाल, हिरामण बारकु माळी ,महेंद्र प्रविण बच्छाव यांनी मिळून घरात कोंबून जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने कन्हैयाचे वडील ब्रिजलाल गुजर ठाकरे यांनी पोलीसात धाव घेतली. संबधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी साक्री पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी केली. व संबधीतावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी सकाळपासुन विद्यार्थी पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. पंरतू त्यांच्या मागणीवर कारवाई होत नसल्याने सायंकाळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्ग सहावर रास्ता रोको केला. दरम्यान डि.वाय.एस.पी निलेश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे यांनी विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी समजण्याच्या परिस्थीत नसल्यामुळे धुळे येथील आर.सी पथकास पाचारण करण्यात आले होते.

मारहाणीचे कारण गुलदस्त्यात
संशयितांचे महिलांशी अनैतिक संबधांची माहिती कन्हैयाला मिळाल्यामुळे त्याला मारहाण करून बेपत्ता करण्यात आल्याची गावात चर्चा आहे. अटकेत असलेल्या संशयितांना धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवले असून कन्हैयाला मारहाण करण्याचे कारण व त्याला कुठे बेपत्ता करण्यात आले विचारले असता संशयितांनी कोणतीच माहिती दिली नसल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे. दरम्यान पोलीसांचा तपास सुरू आहे.

आमदारांच्या मध्यस्थीनंतर गुन्हा दाखल
तरूणास मारहाणीच्या घटनेचे प्रकरण अधिक चिघडत असल्याची माहिती आमदार डी.एस.अहिरे यांना कळताच त्यांनी धुळे येथील पोलीस अधिक्षक एस.चैतन्या यांची भेट घेवून संबधीतांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. त्यानूसार पोलीस अधिक्षकांनी साक्री पोलीसांना गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले. तद्नंतर उपविभागीय अधिकारी निलेश सोनवणे यांनी विद्याथ्यार्ंना शांत करीत संशयितांवर गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केले जाईल असे आश्‍वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आदोंलन मागे घेतले. दरम्यान रात्री उशीरा संशयितांपैकी हवालदार सनील कोतवाल, हिरामण माळी या दोघांना अटक करण्यात आली होती.

संशयिंतांच्या घरांवर तुफान दगडफेक
बोदगाव येथील कन्हैया हा शिक्षणासाठी साक्री येथे शिकत असल्याने तो दहिवेल गावात रूम करून राहत होता. याच घरात त्याला कोंबून मारण्याचा प्रकार घडला आहे. मारहाणी नंतर कन्हैया बेपत्ता असल्याचे त्याच्या वडीलांनी पोलीसांनी माहिती दिली. त्यामुळे कन्हैयाचे अपहरण केले गेले किंवा त्याचा घातपात झाला असाव असा संशय त्याच्या वडीलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद पुन्हा मंगळवारी दहिवेल गावात उमटले. आदोंलनकर्त्यांनी कन्हैया परत यावा व तिसर्‍या आरोपीस अटक करावी या मागणीसाठी गावातील संशयितांच्या घरावर तसेच दुकान व गांड्यावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत दुकाने, चारचाकी,दुचाकी फोडल्या आहेत.

पोलीस कॉ.कोतवाल निलंबित
पो.कॉ.सुनील कोतवाल याने कन्हैयास कमरेच्या पट्टयाने क्रुरपणे मारल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. धुळे येथील पोलीस अधिक्षक एस.चैतन्या यांनी सदर घटनेची चौकशी केली असता, हवालदार कोतवाल यास तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले.
पो.कॉ.सुनील कोतवाल याने कन्हैयास कमरेच्या पट्टयाने क्रुरपणे मारल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. धुळे येथील पोलीस अधिक्षक एस.चैतन्या यांनी सदर घटनेची चौकशी केली असता, हवालदार कोतवाल यास तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश दिले.