दहिवेल गावात दहशतीचे वातावरण

0

साक्री । तालुक्यातील दहिवेल गावात राहणार्‍या आदिवासी तरूणास पोलीस कर्मचार्‍यासह इतर दोघांनी बेदम मारल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर साक्री शहरासह दहिवेल गावात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे एक प्रकारे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गावातील ग्रामस्थ याच्या निषेधार्थ 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

रविवारी रात्री घडली घटना
बोदगाव गावाचा रहिवाशी असलेला कन्हैया शिक्षणासाठी दहिवेल गावात रूम करून राहत होता. रविवारी रात्री त्याला तीन जणांनी बेदम मारल्याचा व्हिडीओ सोमवारी साक्री शहरात पसरल्यामुळे कन्हैयाच्या वडीलांनी पोलीसांकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली. मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करावी व बेपत्ता कन्हैयास परत आणावे यासाठी येथील आदिवासी विद्यार्थी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते.

मंगळवारी रात्री संशयितास अटक
दरम्यान पोलीस अधिक्षक एस.चैतन्या यांच्या आदेशान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली होती. मात्र एक संशयित फरार होता. तर कन्हैयाचादेखील तपास न लागत असल्यामुळे दहिवेल गावात पुन्हा आंदोलन उफाळून आले होते. आंदोलनकर्त्यांनी आरोपींच्या घरावर तसेच गाड्या व मोटार सायकलींवर दगडफेक करून तोडफोड केली होती. धुळ्याहून कमांडो पथकास पाचारण करण्यात आल्यामुळे या हिंसक वळणाला आवर घालण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी रात्री उशीरा तिसरा आरोपीस अटक करण्यात आली होती.या सर्व घटनाने दहिवेल परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून येथील नागरिकांनी या दहशतगर्दीच्या विरोधात निषेध म्हणून सर्व समावेशक मोर्चा काढण्याचे येत्या 24 मार्च रोजी आयोजीले असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कन्हैया नवापाडाच्या शिवारात आढळला
मारहाणीनंतर बेपत्ता झालेला कन्हैया बुधवारी सकाळी साक्री तालुक्यातील नवापाडा गावाच्या शिवारात आढळूनआला. तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी पिंपळनेर पोलीसांना त्याची माहिती दिली. दरम्यान पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांची मेडीकल तपासणी करून त्याच्या वडीलांच्या स्वाधीन केले.