दहिवेल परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली पाच दुकाने

0

साक्री । किराणा दुकानातील खाद्य तेलांच्या टाक्यांची चोरी, सायबर कॅफे फोडले, मोबाइल दुकानात चोरी यासह इतर चोरीच्या घटनांचा पोलीस तपास शून्य असल्याने दहिवेलला कायद्याचे राज्य उरलेच नाही. दहिवेलवर राज्य फक्त चोरांचेच असेच चित्र सध्या दिसत आहे. पोलीस यंत्रणा कुंभकर्णी झोपेत असल्याने चोरट्यांची दिवाळी सुरु आहे. एकाच रात्रीतून चोरट्यांनी पाच दुकाने फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे व्यापारी वर्ग भयभीत झाला असून पोलिस प्रशासनाप्रती संतापाची लाट ग्रामस्थ व्यापार्‍यांमध्ये उसळली आहे.

साड्या, कपड्यांसह लाखोंचा माल लंपास
दहिवेल गावातील पिंपळनेर रस्त्यावर मुख्य बाजारपेठ असून या बाजारपेठेलाच रात्री चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी पिंपळनेर रस्त्यावरील पार्थ डिजीटल फोटोज, म्हाळसाई कलेक्शन, जय भोले किराणा दुकान, शिवम इलेक्ट्रीकल्स, ओम साई मोबाइल ही दुकाने फोडली. यापैकी दोन दुकानांमध्ये चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. मनोहर बच्छाव यांच्या मालकीच्या पार्थ डिजीटल या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील तीन कॅमेरे, फ्लॅश गन, लंपास केली. या दुकानातून चोरीला गेलेल्या मालाची किंमत तीन लाखांच्या घरात आहे. हे दुकान साफ केल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा म्हाळसाई कलेक्शन या साडी दुकानाकडे वळविला. दुकानाचे शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किंमतीच्या साड्या एक लाख रुपये किंमतीचे कपडे घेवून पोबारा केला. या दुकानाचे मालक दिनेश शिंपी असून ते व्यवसायासाठी नंदुरबारहून दहिवेलला ये-जा करीत होते. चोरट्यांची भुक एवढ्यावर भागली नाही. त्यांनी जय भोले किराणा, शिवम इलेक्ट्रीकल्स, ओम साई मोबाइल ही दुकानेदेखील फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुकानांमधून त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी
शुक्रवारी सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍यांनी पोलिसांकडे धाव घेतली. साक्री पोलीस निरीक्षक पवार, दहिवेल औट पोस्टचे तीन पोलीस कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी आले. त्यांच्यासोबत ठसे तज्ञ आणि श्‍वानपथक देखील होते. पंचनाम्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते. पोलीस तपासाची फक्त कागदी कारवाई करु नका आता तरी तपासाची चक्रे फिरवा, चोरट्यांच्या मुसक्या आवळा. त्याचबरोबर पुन्हा चोर्‍या होवू नये, यासाठी पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.