मुंबई । कमी दराची निविदा येऊनही प्रशासनाने पुनर्निविदा काढण्याचा घाट घातल्यामुळे दहिसरमधील अनेक विकासकामे रखडली आहेत. या आडमुठ्या धोरणाविरोधात नगरसेवकांनी प्रभाग समितीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या प्रकाराची दखल घेत तातडीने कार्यवाही करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिका निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डमधील विकासकामे आपल्या नगरसेवक निधीतून करण्यासाठी आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याकडे प्रभाग समितीमध्ये मंजुरीसाठी पाठवली.
प्रशासनाचा आडमुठेपणा
प्रभाग समितीत ही कामे मंजूरही झाली. मात्र, या कामांसाठी कमी दराने निविदा आल्याने पुनर्निविदा करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले आहे. यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. प्रशासन नाहक आडमुठेपणा करीत असल्यामुळेच विकासकामे रखडल्याचे सांगत शिवसेना नगरसेवक संजय घाडी यांनी हरकतीचा मुद्दा मांडला.
याप्रकरणी आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देण्यात आले असून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रिद, हर्षद कारकर, सुजाता पाटेकर, तेजस्वी घोसाळकर, गीता सिंघण, रिद्धी खुरसुंगे, संध्या दोशी, जगदीश ओझा, जितेंद्र पटेल आदी उपस्थित होते.