दांडेकर नगर झोपडपट्टीधारकांना महिना अखेर मिळणार घरकूल

0

जळगाव । शहरातील दांडेकर नगर झोपडपट्टीधारकांसांठी एकात्मिक झोपडपट्टी निर्मुलन योजनेतंर्गत पिंप्राळा येथे 472 घरकुलांची योजना सुरु आहे. यातील 144 घरकुलांचे काम मुदती संपल्यानतंर देखील सुरु झाले नसल्याने ही घरकुले पंतप्रधान आवास योजनेत वर्ग करण्यात आली आहे. त्याचा डिपीआर तयार करण्याच्या सूचना संबंधीत एजन्सीला देण्यात आल्या आहेत. 472 घरकुलांपैंकी पहिल्या टप्प्यातील 252 घरकुले महिना अखेर पूर्ण करुन लाभार्थ्यांना सोडत काढून वाटप करण्यात येणार असल्याची माहीती शहर अभियंता सुनिल भोळे यांनी दिली आहे. घरकुल वितरणापूर्वी लाभार्थ्यांना त्यांचा हिस्सा 20 हजार रुपये भरणे आवश्यक असल्याचे प्राशासनातर्फे सांगण्यात आले.

उपायुक्त खोसे यांनी केली पहाणी
उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी आज पिंप्राळा हुडको परिसरात सुरु असलेल्या याकामांची पाहणी पहाणी केली. याप्रसंगी शहर अभियंता सुनिल भोळे हे देखील उपस्थित होते. महानगरपालिकेने रेल्वे लाइनजवळील दांडेकर नगर झोपडपट्टीधारकांसाठी शासनाच्या आयएचएसडीपी योजनेतंर्गत पिंप्राळा शिवारतील गट न. 214 येथे भाग 1 वर घरकुल योजनेला 15 जानेवरी 2013 रोजी या कामास सुरुवात करण्यात आली होती. योजनेतंर्गत 472 घरकुलांचे कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

घरकुलांचे किरकोळ काम बाकी
आता या योजेनेच्या पहील्या टप्प्यात 328 घरकुलांचे बांधकाम सुरु झाले आहे. यातील 252 घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या घरकुलांचे केवळ रंगकाम, पाण्याची टाकी व वीजपुरवठा ही कामे बाकी आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत घरांची काम पूर्ण करून लॉटरीपध्दतीने लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. तर उर्वरित 76 घरांचे दुसर्‍या टप्प्यात तीन महिन्यात वाटप होणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेत वर्ग
या योजनेतील एकूण 472 घरुकुलांपैकी 328 घरकुलांचे काम पूर्णत्वास आले असले तरी 144 घरकुलांच्या कामांना मुदत संपून देखील सुरुवात झालेली नाही. यामुळे महानगरपालिकेकडून यासाठी वर्षभर मुदतवाढ मागण्यात आली होती. परंतु, याला मुदतवाढ न मिळाल्याने ही घरकुले आता पंतप्रधान आवास योजनेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी डिपीआर तयार करण्यात येत असल्याची माहीती शहर अभियंता सुनिल भोळे यांनी दिली.