दांभिकांची मांदियाळी

0

सत्य तोच धर्म करावा कायम।
मानावा आराम। सर्वाठायी।
मानवांचा धर्म, सत्य हीच नीती।
बाकीची कुनीती। जोती म्हणे॥
यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचे हे विचारवैभव लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. महात्मा फुलेंची जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यानिमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं आणि मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं, हाच फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. याची जाणीव खरं तर व्हायला हवी होती, महात्मा फुले यांच्या निवासस्थानी समताभूमीवर आणि आंबेडकरांच्या स्मारक परिसरात जमलेली गर्दी ही दांभिकपणा स्पष्ट करणारीच जाणवत होती. वैयक्तिक स्वार्थासाठी महात्मा फुलेंचा वापर करण्यासाठी सरसावल्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवला आहे. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखे आहे ते मिरवलं जातं आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणार्‍यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच आहे. आपण एका बाजूला सुधारणेचा आव आणतो आणि दुसर्‍या बाजूला देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही, अशा समाजाला जोतिबा फुले कळले नाहीत आणि त्यांची बहुजन समाजाची चळवळ कळली नाही. कारण बहुजन या शब्दाचा अर्थच आपल्याला कळला नाही. काहींनी ‘बहुजन’ म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून फुले आणि आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. त्यांना राजकारणाची, आपल्या जातीची, स्वार्थाची चिंता आहे. जोतिबांच्या आणि भीमरावांच्या विचारांचे त्यांना सोयरसूतक नाही. वास्तविक फुले-आंबेडकरांचा विचार केवळ तळाच्या माणसांनाच नव्हे, तर राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. भारतातील अनेक सामाजिक विकासाची बीजेही फुले-आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यांसारखे अनेक उत्क्रांतिकारक विषय फुले-आंबेडकर यांच्या विचारात सामावलेले आहेत. आजही सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेते, तेव्हा त्यावेळी होणार्‍या चर्चेचं दुसरं टोक हे फुले-आंबेडकर विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी समर्थ केली. परंतु, अतिरेकी शिवराळपणामुळे ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडे सरकली आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली.

या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळे जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले-आंबेडकरांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्नीक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवली? ते सांगायची आवश्यकता नाही. आज महाराष्ट्रात जे घडते आहे ते पाहिले तरी याची जाणीव सार्‍यांनाच होईल. फुले-आंबेडकरांच्या विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते, तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा जोतिबा फुलेंचे विचार हीच होती. या सार्‍यांनी फुले यांच्या विचाराचे ऋण जाहीरपणे मानले होते. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले-आंबेडकरांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणार्‍या पोटभरूवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानतेबरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी तर हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबीयांनाही गुंतवले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण हटल्या नाहीत. फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांचेच विचार आपले सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहे. हा फुले-आंबेडकर यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला, तरी सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवत आहे. दलित वस्त्या बळकट झाल्यात. मोठ्या प्रमाणात स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्या, कमावत्या झाल्या, तरी बहुतांश संसारात त्यांचं स्थान दुय्यम आहे. स्त्री अजूनही उपभोगाची वस्तू आहे, अशीच भावना समाजात आहे. देवळं वाढलीत, त्या पुढच्या रांगाही वाढल्या आहेत. लांबल्या आहेत. अफरातफर व्हावी इतका गल्ला देवळात जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्रात दिसत आहे, तरीदेखील फुले-आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणार्‍यांची संख्या कमी नाही. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणार्‍यांनीही आपली वागणूक बदलली आहे. फुले-आंबेडकर नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागले आहेत. सदासर्वदा त्यांचेच नाव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणार्‍या त्यांच्या अनुयायांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी वाईट म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गाडण्याऐवजी त्या डोक्यावर घेऊन मिरवण्यातच ते धन्यता मानत आहेत. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा…!

हरीश केंची – 9422310609