मुंबई:दोन आठवड्यापूर्वीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा १.८ कोटी रुपयांना लिलाव करण्यात आलेला असतानाच आता त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील १४ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. या सर्व मालमत्ता दाऊदची बहीण हसीना पारकर आणि आईच्या नावे आहेत. अँटी स्मगलिंग एजन्सी या संपत्तीचा लिलाव करणार आहे.
दाऊदच्या खेडमधील या तीन मालमत्तांमध्ये एक तीन मजली बंगला आहे. या बंगल्यात दाऊद नेहमी यायचा. शिवाय पेट्रोल पंपासाठीचा एक प्लॉटही आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीने पुण्यातील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याला या १४ मालमत्तांची किंमत ठरविण्यास सांगितले आहे. या सर्व मालमत्ता दाऊदच्या नावावर असून गुन्हेगारीच्या पैशातून या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत.
खेडमधील मुख्य मालमत्ता हसीनाच्या नावे आहे, तर इतर मालमत्ता दाऊदची आई अमिना बीच्या नावे आहे. दाऊदचे बहीण-भाऊ मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीटवर राहतात.