दाऊद कराचीत व्हेंटिलेटरवर?

0

नवी दिल्ली : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची प्रकृती अत्यंत खालावली असून, कराचीतील एका खासगी रुग्णालयात त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.

दाऊदला अचानक हदयविकाराचा झटका आल्याने कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला ब्रेन ट्युमरही झाला होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ती यशस्वी होऊ शकलेली नाही. त्यामुळे दाऊद मरणाच्या दारात असल्याचे वृत्त पाकिस्तानातील काही वृत्तसंस्थांनी शुक्रवारी रात्री दिले.

दाऊद जिवंत की मेला?
दाऊदला पक्षाघाताचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. 22 एप्रिलला त्याच्या त्याच्या मेंदूवरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, ती अयशस्वी ठरल्यामुळे दाऊदला अर्धांगवायूचा झटका येऊन त्याची प्रकृती खालावल्याचेही सांगितले जाते. त्यानंतर काही काळातच दाऊद मेल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

थोटा शकीलकडून इन्कार
दाऊदचा साथीदार छोटा शकीलने या वृत्ताचा तातडीने इन्कार केला. या सर्व चर्चा निराधार आहेत. दाऊदची प्रकृती व्यवस्थित आहे, असे छोटा शकीलने भारतातील काही माध्यमांशी फोनवरून बोलताना सांगितले. दाऊदच्या कुटुंबीयांनीही ही चर्चा निराधार असल्याचा खुलासा केला आहे. दाऊद त्याची पत्नी मेहजाबीन हिच्या काकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, या खुलाशानंतरही गुन्हेगारी जगतातील चर्चा थांबलेली नाही.

गुप्तचर यंत्रणांची नजर
भारतीय सुरक्षा यंत्रणांना या बातमीचा सुगावा लागल्यापासून त्यांच्याकडून दाऊदवर नजर ठेवली जात आहे. दाऊद मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट आणि अन्य गुन्ह्यांप्रकरणी तो भारताला हवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहे. मात्र, पाकिस्तानने नेहमीच दाऊद आपल्या देशात असल्याचे नाकारले आहे