जळगाव। सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचे नावाने दोन भामट्याने आसोदा येथील एका घरात घुसून महिलांच्या तोंंडावर गुंगीची पावडर फेकत गळ्यातील सहा तोळे वजनाच्या दोन पोत लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजता घडली. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, महिलांनी लागलीच गावातील नागरिकांना घटनेची माहिती देताच नागरिकांनी चोरट्यांचा शोध घेतला मात्र, चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले.
दुचाकीवरून आले भामटे; पोत घेवून काही सेकंदात पसार
आसोदा गावातील मढीपेठ चौकात राहणार्या नरेंद्र मधुकर नारखेडे यांच्या घरात हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी नारखेडे कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर घरात त्यांच्या पत्नी हर्षा व वृद्ध आई कुसुम ह्या दोघीच घरात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेले दोन भामटे त्यांच्या अंगणात थांबले. ‘उजाला’ कंपनीतून आले असून सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे भामट्यांनी सांगीतले. हे सांगत असतानाच दोघांनी थेट घरात प्रवेश केला. हर्षा नारखेडे यांनी त्यांना हटकत घरातून बाहेर निघण्याचे सांगीतले. सेकंदातच त्यातील एका भामट्याने हर्षा यांच्या चेहर्यावर काहीतरी पावडर फेकली, त्यामुळे त्यांना गुंगी आली. त्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील 4 तोळे वजनाची सोन्याची पोत काढून घेतली. तर दुसर्या भामट्याने कुसूम नारखेडे यांच्याकडे मोर्चा वळवला. त्याने देखील पावडर फेकली, त्यानंतर कुसूम नारखेडे यांनी स्वत: आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत काढून भामट्याच्या हाती दिली. अवघ्या काही सेेकंदातच हा प्रकार घडला. त्यानंतर दोघी भामट्यांनी पोबारा केला. काही सेकंदांनी हर्षा व कुसूम नारखेडे यांना शुद्ध आली. भामटे सोन्याच्या पोत घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गल्लीत येऊन आरडा-ओरड केली. तो पर्यंत भामटे निघुन गेले होते. या घटनेमुळे आसोदा गावात प्रचंड खळबळ उडाली होती. नारखेडे यांचे घर गजबजलेल्या परिसरात आहे. या परिसरात असा प्रकार घडणे जवळपास अशक्य आहे. नागरीकांची वर्दळ असलेल्या मढीपेठ भागात भामट्यांनी सोने पळवल्यामुळे आसोदा गावातील नागरीक संतप्त झाले होते. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वेगात पळाले भामटे
या घटनेची बातमी संपुर्ण गावात वार्यासारखी पसरली. फोनच्या माध्यमातून गावातील तरुणांनी भादली, नशिराबाद, ममुराबाद परिसरातील लोकांना माहिती देत भामट्यांचे वर्णन सांगितले. तसेच त्यांना पकडण्याचे आवाहन केले. काही तरूण या तीनही गावांच्या दिशेने निघाले होते. ममुराबाद येथे पोहचल्यानंतर तेथील दुकानदार, टपरीचालकांकडून माहिती घेतली. दोन तरूण भरधाव वेगात ममुमराबादकडून विदगावच्या दिशेने गेल्याची लोकांनी सांगीतले. त्यानुसार आसोद्याच्या तरूणांनी विदगावपर्यंत शोध घेतला, पुढील गावांमध्ये फोन करून माहिती दिली. परंतू भामटे मिळून आले नाहीत.