दागिने विकून आजीबाईंनी भरली रक्कम

0

शहापूर । उल्हासनगर महानगरपालिकेने अभय योजना सुरू केली असून, या योजनेचा लाभ थकीत मालमत्ताधारकांनी घ्यावा याकरीता शहरात जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. या अभय योजनेचा लाभ आपल्यालाही घेता यावा याकरीता 80 वर्षाच्या वेणूबाई शिंदे या आजीबाईंनी चक्क आपले सोन्याचे दागिने विकून आपल्या थकीत मालमत्ताकराची रक्कम भरून या योजनेचा लाभ घेतला आहे. वेणूबाई शिंदे या शहरातील कॅम्प नं. 4 येथील नालंदा शाळेजवळील लुंबीवणीवन सोसायटीमध्ये राहतात.

प्रशासनाच्या योजनेचा फायदा
2008 पासून वेणूबाई शिंदे यांनी मालमत्ताकर भरला नसल्याने त्यांची 52 हजार 346 रूपयाची थकीत मालमत्ताकराची रक्कम झाली होती. एवढी मोठी रक्कम आपण कशी भरायची असा प्रश्‍न त्यांना पडला होता. पालिकेने पुन्हा अभय योजना सुरू केल्याने व आपण थकीत मालमत्ताकर भरला तर आपल्याला 75 टक्के व्याज माफ होईल व आपल्याला उर्वरीत रक्कम भरावी लागेल व चिंताही दूर होईल या हेतूने वेणूबाई यांनी आपल्याजवळील सोन्याचे दागिने विकून 32 हजार रूपये जमवले.

अभय योजनेमुळे झाली चिंता दूर
थकीत असलेली 2008 पासूनची ते 2017 पर्यंतचा मालमत्ताकर भरायचा असल्याचे वेणूबाईंनी अधिकार्‍यांना सांगितले. त्यावेळी 52 हजार 346 रूपयाच्या थकीत मालमत्ताकरावरील अभय योजनेअंतर्गत 20 हजार 561 रूपयाचा 75 टक्के व्याज वेणूबाई यांना माफ करण्यात आला व त्यांच्याकडून 31 हजार 785 रूपये घेऊन त्यांच्या थकीत मालमत्ताकराची रक्कम पूर्ण झाल्याचे सांगताच वेणूबाई यांना आनंद झाला. अभय योजनामुळे यांची चिंता दूर झाल्याचे वेणूबाई यांनी सांगितले.