मुंबई : दादर व माहीम चौपाटी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिका खाजगी कंत्राटदाराकडून या ठिकाणी साफसफाई करून घेणार आहे. या चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठीचे कंत्राट, मे. कोस्टल क्लिअर एन्व्हायरोला 11 कोटी 66 लाख रुपये सहा वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. सदर प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर बोलताना सेनेचे मिलिंद वैद्य यांनी नेमण्यात आलेले कंत्राटदार निविदेमधील अटींना धुडकावत काम करतात. नियमानुसार प्रस्ताव मंजूर झाल्यावर सात दिवसांत कामास सुरुवात झाली पाहिजे. या चौपाटीवर कचर्याचे ढीग साचले आहेत. कंत्राटदार काम करत नसेल तर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर बोलताना अतिरिक्त आयुक्त सिंघल यांनी कंत्राटदाराने योग्य प्रकारे साफसफाई केली नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी जुहू आणि वर्सोवा या ठिकाणच्या साफसफाईबाबत कामचुकार करणार्या कंत्राटदारांवर कारवाई असून काहींना तर काळ्या यादीतही टाकले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला. मोठ्या प्रमाणामुळे या समुद्रकिनार्यावर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. तसेच अस्वच्छता निर्माण होते. शिवाय या समुद्रात तरंगणारे प्लास्टिक, थर्माकोल, कचरा आदी तरंगता कचराही समुद्री लाटेसह किनार्यावर येतो. त्यामुळे पालिकेने या समुद्र किनार्याची म्हणजेच जुहू, माहीम चौपाट्या याठिकाणी दररोज स्वच्छता राखण्यासाठी खाजगी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला.