येरवडा । विद्येचे माहेरघर म्हणून ज्या पुणे शहराकडे पाहिले जाते. त्या शहरातील पालिकेच्या शाळांचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येतात. दादाची पडळ येथील शाळा गेल्या चाळीस वर्षांपासून गोठ्यातच भरत आहे. विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या या शाळेची मुक्तता होणार का? असा संतप्त सवाल रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक तनपुरे यांनी उपस्थित केला आहे.लोहगावातील दादाची पडळ हा भाग 1978 साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. येथील गोरगरीब मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा याकरीता बालवाडी ते चौथीपर्यंतच्या मुलांसाठी येथे शाळा उभारण्याचा निर्णय पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आला. मात्र शाळेला जागा व इमारत उपलब्ध नसल्यामुळे किसन खांदवे यांच्या गोठ्यात 60 रुपये भाडेतत्वावर मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली. 122 विद्यार्थी या शाळेत धडे गिरवत आहेत. चौथीपर्यंत तीन शिक्षिका, दोन रखवालदार, एक सेवक तर बालवाडीसाठी एक सेवक व एक शिक्षिका कार्यरत आहे.
छताला गळती
गोठ्यातील जागा अपुरी पडत असल्याने येथील एका मंडळाने तालीम व एक खोली शाळेसाठी दिली आहे. मात्र छतावरील कवले फुटलेली असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होते. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गात बैठक व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव जमिनीवर बसावे लागत आहे. शिक्षकांचे साहित्य ठेवण्याकरीता जागाच उपलब्ध नसल्याने वर्गाच्या एका कोपर्यात साहित्य ठेवण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे. मुलांना खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारे क्रीडांगण नसल्याने विद्यार्थी क्रीडा क्षेत्रापासून लांब आहेत. त्यांना कोणत्याही शालेय स्पर्धेत भाग घेता येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
निवडणूक काळात राजकीय नेते शाळेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जरी देत असले तरी निवडणूक झाल्यावर त्यांना या आश्वासनांचा विसर पडतो. अनेक पालिकेच्या शाळांनी मुलांना जाण्या-येण्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. मात्र येथील मुलांसाठी अशी कोणतीही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षण मंडळ हे मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे.
शिक्षण मंडळ उदासीन
गेल्या 40 वर्षात अनेक राजकीय नेते या प्रभागातून निवडून गेले असले तरी त्यांना मुलांच्या शिक्षणाचे काही देणे-घेणे नाही. विशेष म्हणजे याच प्रभागात शिक्षण मंडळाचे माजी सदस्य राहत असून त्यांच्या काळात देखील त्यांनी शाळेच्या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. 4 ते 5 महिन्यांपूर्वी पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी शाळेची पाहणी करून लवकरच उपाययोजना करण्याचा दावा केला होता. मात्र अद्याप या भागाकडे कोणीही फिरकलेले नाही. यावरूनच राजकीय नेत्यांसह पालिका शिक्षण मंडळ देखील मुलांच्या शिक्षणाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
मुले रस्त्यावर खातात डबे
शाळेच्या पटांगणात झाडेझुडपे वाढल्याने सरपटणार्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परीसरात भीती पसरली आहे. त्यातच जेवायला बसण्याचीही सुविधा नसल्याने मुले रस्त्यावर बसून डबे खातात. शाळेला वीजमीटर ऐवजी थेट विद्युत तारेतून वीज पुरविण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आंदोलनाचा इशारा
कारण यापूर्वी देखील तात्कालीन शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी यांनी शाळेची पाहणी करून शाळा सुधारण्याचे आश्वासन दिले होते. याला 10 वर्षे उलटून देखील सुधारणा न झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांमध्ये देखील नाराजीचे सूर उमटले आहेत. यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तनपुरे यांनी दिला आहे.