आत्महत्त्येचे कारण अस्पष्ट
जळगाव – घरात कुटूंबीय झोपले असतांना वरच्या खोलीत झोपण्यासाठी गेलेल्या रितेश रविंद्र कदम वय 35 रा. श्रीराम नगर, दादावाडी, या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. दरम्यान रितेशने रात्री त्याचा पुतण्यासोबत जेवणे केले असल्याची माहिती मिळाली असून आत्महत्येमागचे कारण कळू शकलेले नाही.
श्रीराम नगर येथे रितेश हा वडील, आई मंदा, लहान भाऊ दिपेश, वहिनी भारती या कुटुंबियांसह राहत होता. रितेशचे वडील रविंद्र बाबुराव कदम हे परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. भाऊ हा खाजगी रुग्णालयात नोकरीला आहे. तर रितेश हा खाजगी विमा कंपनीत काम करुन उदरनिर्वाहात हातभार लावायचा. रितेशचा विवाह झाला असून तीन ते चार वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे.
रुसलेल्या पुतण्यासोबत रात्री केले जेवण
रितेशचा पुतण्या हा लोकेश हा रुसलेला होता. रागामुळे त्याने जेवण करण्यास नकार दिला. रात्री 11.30 वाजता रितेशने त्याचा रुसवा दूर करुन त्याच्यासोबत पुन्हा जेवण केले. आईनेच दोघांना वाढून दिले. यानंतर पुतण्याला झोपवून रितेश हा वरच्या खोलीत झोपायला गेला. सकाळी नेहमीप्रमाणे रितेशला आई उठविण्यासाठी गेली. मात्र दरवाजा असल्याने तो उघडत नव्हता. यानंतर आईने सून भारतीला हिला बोलाविले. मात्र तरीही प्रतिसाद मिळत नव्हता. भारतीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, रितेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर दोघांना जागेवरच हंबरडा फोडत प्रकार घरातील वडील तसेच दिपेशला कळविला. दिपेशने याबाबत तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती नुसार तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.