भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, की मस्ती आली आहे? ते ज्या शेतकरी कुळात जन्माला आले त्या कुळालाच त्यांनी काल सणसणीत शिवी हासडली. या शिवीचे काय राजकारण करायचे ते विरोधक करत बसतीलच! परंतु, अशी शिवी हासडताना दानवेंना जनाची नाही किंबहुना मनाची तरी कशी लाज वाटली नाही? तुरीचा प्रश्न आधीच चिघळलेला असताना, ही शिवी हासडून दानवेंनी शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले. राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडतात साले! असे म्हणणार्या दानवेंची आणि त्यांच्या सरकारची शेतकर्यांप्रति मानसिकता उघड होते. शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आणि शेती उत्पादनाला चांगला भाव देऊ, असे सांगून भाजपने राज्यात सत्ता मिळवली होती. तुरीचे उत्पादन घेण्यासाठी याच सरकारने प्रोत्साहन दिले होते. आपल्याच आश्वासनांची पूर्तता करणे तर दूरच, भाजपचा प्रदेशाध्यक्षच शेतकरीवर्गाला शिवी हासडण्याचे काम करतो आहे, यापेक्षा दुर्देवी वेळ शेतकर्यांवर काय येऊ शकते. ही फसवणूक शेतकरी लक्षात ठेवेल अन् आणखी दोनच वर्षांनंतर तो त्याची पुरेपूर परतफेड करेल, हे दानवेंनी लक्षात ठेवावे, असे आम्ही त्यांना निक्षून सांगू इच्छितो. आम्हीदेखील शेतकरी कुळातच जन्माला आलो आहोत. बाप शेतकरी असल्यामुळे या कुळाच्या व्यथा अन् वेदना आम्हाला ठावूक आहेत. दानवेही आमच्याच शेतकरी कुळातले असले तरी त्यांची भाषा पाहता, ते कृतघ्न झालेले दिसतात. त्यांचे हे कृतघ्नपण सत्तेच्या मस्तीतून आले आहे अन् सत्ता गेली की त्यांची ही मस्तीही नक्कीच जाईल. तो दिवस फार दूर नाही, हेही दानवेंनी लक्षात ठेवावे. भाजपच्या धुरिणांना शेतकरीप्रश्नी फारच कळवळा असेल तर त्यांनी तातडीने दानवेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले पाहिजेत. नाही तर शेतकरीउद्रेक हे सरकार सोसवू शकणार नाही.
शेतमालाच्या बाजारपेठेचा नियम असा आहे, की शेतमालाचे बाजारभाव हे केंद्र सरकार ठरवते. या भावात शेतमालाची खरेदी होत नसेल, तर तो खरेदी करण्याची जबाबदारी सरकार नावाच्या यंत्रणेची असते. तूर, ऊस, बाजरी किंवा इतर शेतमालाच्या किमती या केंद्र सरकारने ठरवलेल्या आहेत. परंतु, त्या दरात त्यांची खरेदी होत नाही. खास करून तुरीचे दर बाजारात घसरलेले आहेत. त्यामुळे तुरीची खरेदी ही सरकारला करावीच लागेल. दुसरी बाब अशी, की तूरडाळीचे भाव भडकले होते अन् याच सरकारच्या काळात तूरडाळ घोटाळा होऊन व्यापारीवर्गाने साठेबाजी केली होती, तेव्हा राज्यातील सरकारने तूर उत्पादनासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे शेतकर्यांनी तुरीचे बंपर उत्पादन घेतले. उत्पादन जास्त झाले की, भाव कोसळतात हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. तो तुरीच्या बाबतीतही अपवाद कसा असेल? त्यामुळे शेतकर्यांना पाच ते साडेपाच हजारांचा भाव देणे ही सरकारची जबाबदारी होती. केंद्रात अन् राज्यात भाजपचेच सरकार असल्याने त्यांनी तसा भाव दिला. परंतु, तूर खरेदीवरून नाटकं चालवली. कधी बारदाना नाही, कधी खरेदीची सोय नाही असे थातूरमातूर कारणे सांगून खरेदी रखडवली. खरेदीच्या तारखा वाढवल्या, तरीही बाजार समित्यांत शेतकरी तूर घेऊन उभे आहेत. तुरीची खरेदी होते किंवा नाही याची चिंता लागून असताना दानवेंसारखे जबाबदार नेते अत्यंत बेजबाबदारपणे शेतकर्यांना शिवी घालत असतील तर या शेतकर्यांनी आणखी किती काळ संयम राखणे अपेक्षित आहे. दानवेंनी शेतकर्यांचा अपमान केला आहे. यापूर्वीही त्यांनी अशीच बेजबाबदार विधाने केली होती. विरोधकांनी शेतकरी आत्महत्या करणार नाही हे लेखी द्यावे.
आम्ही कर्जमाफी देतो, असेही दानवे बरळले होते. शेतकरी आत्महत्या का होत आहेत? हे दानवेंना माहीत नाही का? स्वतः शेतकरी असल्याने दानवेंना शेतकरीवर्गाच्या हालअपेष्टा ठावूक नाहीत का? तर त्याबाबत दानवेंना सगळे कळते. परंतु, वळत नाही. कारण डोक्यात सत्तेची मस्ती चढलेली आहे. यापूर्वीच याच सत्तेच्या मस्तीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी धरणात मुतण्याची भाषा केली होती. दादांची ती भाषा शेतकर्यांच्या पायाची आग मस्तकात नेणारी होती. त्याचा वचपा शेतकर्यांनी विधानसभा निवडणुकीत काढला. दादांसह अख्खी राष्ट्रवादी घरी बसवली. दानवेंना प्रदेशाध्यक्षपदावरून तातडीने हटवले नाही, तर भाजपचेही तसेच होईल. दानवेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले, विरोधकांनी टीकेचा भडिमार केला तर शेतकरीवर्गातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रसारमाध्यमांतून हे सारे जनतेपुढे येत असताना आणि प्रकरण अधिक चिघळेल, याचा अंदाज दानवेंना येताच बहुधा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असावी. मात्र, त्यांची त्यामागील भावना खरेच शुद्ध आहे का? मी शेतकर्यांना उद्देशून अपशब्द वापरले नाही, शेतकर्यांचे दु:ख मला माहीत आहे, शेतकर्यांची मने दुखावली असतील तर माफी मागतो, अशा प्रकारे त्यांनी सारवासारव केली. मात्र, प्रकरण पेटले असून त्यांच्या या दिलगिरीचा फायदा त्यांना होईल, असे संभवत नाही. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही ना? अशी शंका येते. त्यामुळे त्यांना भाजपही पदावरून हटवते का ते पाहायचे!