औरंगाबाद- डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणात पाच महिन्यांपासून तुरुंगात असलेला आरोपी रोहित राजेश रेगेला अखेर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज जामीन मंजूर केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने सचिन अंदुरेसह त्याचा सख्खा मेहुणा शुभम सूर्यकांत सुरळे, त्याचा चुलत भाऊ अजिंक्य शशिकांत सुरळे व त्याचा मित्र रोहित रेगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सचिन अंदुरे याने त्याच्याजवळील पिस्तूल व इतर साहित्य हे मेहुणा शुभम सुरळे याच्याकडे सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी दिले होते. शुभमने त्याचा चुलत भाऊ अजिंक्य याच्याकडे ते सोपवले. अजिंक्यने शस्त्रास्त्रांची पिशवी धावणी मोहल्ल्यात राहणारा त्याचा मित्र रोहित रेगे याच्याकडे असल्याचे सीबीआयच्या पथकाला सांगितले. त्यावरून रोहित याच्या घरात मारलेल्या छाप्यात पिस्तूल, काडतुसे यासह एक रिकामी गोणी, दोन मोबाईल, एक तलवार आदी साहित्य बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे समोर आले होते.
रोहित रेगेच्या घरात सापडलेले पिस्तूल डॉ. दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आले नव्हते, असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले. यानंतर हायकोर्टाने रोहित रेगेला जामीन मंजूर केला, अशी माहिती अॅड. वर्षा घाणेकर यांनी दिली. रेगे याची ५०हजार रुपयांच्या जामिनावर सुटका झाली असून दर सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी देण्याचे आदेशही त्याला देण्यात आले आहेत.