Chorvad Unauthorized Entry into the house and brutal beating of the couple: Case against 11 people including Sarpanchpati भुसावळ : तालुक्यातील चोरवड येथे शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी रात्री दुबोले यांच्या घरात सरपंचपतीसह 11 लोकांनी अनधिकृतपणे प्रवेश करून पती-पत्नीसह भांडण सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही बेदम मारहाण केली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरवड गावात उडाली खळबळ
भुसावळ तालुक्यातील चोरवड येथे राहत असलेल्या संगीता कैलास दुबोले यांच्या घरी शुक्रवारी रात्री 11 वाजता प्रवीण नथू गुंजाळ यांच्यासह धनराज नथू गुंजाळ, अनिकेत अमृत गुंजाळ, जयेश धनराज गुंजाळ, विशाल धनराज गुंजाळ, लक्ष्मण राजाराम कळस्कर ,अमृत नथू गुंजाळ, सिद्धेश पाटील, इब्राहीम गवळी यांच्यासह दोन्ही इसमांनी हातात दगड-विटा, काठी घेऊन दूबोले यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारत प्रवेश केला. कैलास यांना दगड, विटा, काठीने मारहाण करण्यात आली तर प्रवीण गुंजाळ यांनी लज्जा वाटेल असे कृत्य करून संगीता दुबोले यांना ढकलून दिले. त्यामुळे डोक्यावर जखम झाली. यावेळी रवींद्र दुबोले, शांताराम भवर, विद्या भवर हे भांडण सोडण्यासाठी आले असता, विद्या भवर यांना वीट मारण्यात आली तसेच या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यास तुमच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन घरातील सामानाचे तोडफोड करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.. या प्रकरणी या सर्व संशयीतांविरुद्ध तालुका पोलिसात संगीता कैलास दुबोले यांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहे.
आमची गावात सत्ता : अॅट्रासिटी दाखल करण्याची धमकी
गुंजाळ यांनी रात्री 11 वाजता दुबोले यांच्याकडे फोन करून कैलास कुठे आहे अशी विचारणा केल्यानंतर त्यांच्या पत्नीने सांगितले की ते झोपले आहे, असे सांगितल्यावर रात्री घरात येऊन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गावात आमची सत्ता आहे. आमच्याबद्दल काही बोलायचं नाही अशी धमकी देण्यात आली तसेच तुम्ही जर पोलिसात गेले तर तुमच्या विरुद्ध लक्ष्मण कळसकरला अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करायला लावू, अशी धमकीही देण्यात आली. या घटनेने चोरवड गावात मोठी खळबळ उडाली आहे.