दारु बंदीसाठी महिलांची निदर्शने

0

सोनगीर । येथे भरवस्तीत असलेले देशी दारुचे दुकान बंद करावे किंवा अन्यत्र हटविण्यात यावे यासाठी महिलांनी दारु दुकानासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी पंचायत समिती सदस्या रुपाली माळी, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा शकुंतला चौधरी, सदस्या प्रतिभा लोहार, जयश्री लोहार, डॉ. सीमा सोनवणे, प्रतिभा बागूल, कल्पना महाजनी, मुन्ना शेख, पठाण, हनीफ मिस्तरी, हमीदाबी पठाण, अरुण खाटिक, शाहीन मिस्तरी व अनेक महिला उपस्थित होत्या. एका आठवड्यात दारु दुकाने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेेश्‍वर वारे यांना निवेदन देण्यात आले. दारुमुळे तरुण पिढी वाया जात असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. दारुमुळे गावातील एकता भंग पावत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी आत्महत्या केल्या आहेत. दारुमुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे हे दारु विक्री बंद झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. भर वस्तीतील हे देशी दारुचे दुकान असल्याने सामाजिक स्वास्थ धोक्यात आले आहे.