नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात दोघा भावांचा दारु सोडण्याचे औषध पिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय मुंडे (वय ३८) आणि विजय मुंडे (वय ३५) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी हदगाव पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात राहणारे संजय मुंडे आणि विजय मुंडे हे दोघे भाऊ हदगाव येथे आले होते. हदगावात दारुचे व्यसन सोडवण्यासाठी उपचार करणाऱ्या एका डॉक्टरकडे ते गेले होते. त्यांना डॉक्टर रविंद्र पोधाडे यांनी सिरप दिले. सिरपमध्ये औषध असल्याचे त्याने सांगितले होते. औषध घेतल्यानंतर ते दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. ३० कि.मी.अंतर पुढे जाताच पोटात आग होते व जीव कासाविस होतो, असे संजय मुडे म्हणाला. पाणी पिऊन तो झोपून गेला. नांदेडला पोहोचल्यावर उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्याला एका खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर विजय मुंडे, अन्य नातेवाईक संजय यांच्या पार्थिवासह गावाच्या दिशेने निघाले.
विजय मुंडे यांना देखील काही वेळाने त्रास जाणवू लागला. त्यांना देखील लोहा येथील सरकारी रुग्णालयात नेले असता तिथे विजय यांचाही मृत्यू झाला. शेवटी नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह घेऊन हदगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. रविंद्र पोधाडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.