दारूसाठा जप्त

0

खेड-शिवापूर । पुणे ग्रामीण पोलिसांचे नियंत्रण पथक आणि राजगड पोलिसांनी खेड-शिवापूर येथील गार्गी हॉटेलवर छापा टाकून अवैधरीत्या विक्री करण्यात येत असलेला दारुसाठा सोमवारी जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण पथकाला पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल गार्गी येथे अवैधरीत्या दारु विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांच्या मदतीने त्यांनी सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता हॉटेल गार्गीवर छापा टाकला. यावेळी येथील काउंटरखाली दोन बॉक्स सापडले. त्यात सुमारे 4 हजार 680 रुपयांच्या बियर आणि विदेशी दारुच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी हा माल जप्त केला आहे. संतोष खिलारे आणि हॉटेल मालक खोपडे या दोन जणांवर अवैधरीत्या दारु विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एल. मोहिते त्यांचे सहकारी तसेच राजगडचे फौजदार मोहन तलबार, पोलिस हवलदार अजय शिंदे, संतोष शिंदे, दुर्गा जाधव, प्रज्ञा पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.