दावडीमध्ये पार पडली हरण्याची दशक्रिया 

0
बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित
राजगुरूनगर : पुणे व नगर जिल्ह्यातील बैलगाडा घाट गाजवणारा आणि घाटात बैलगाडा शौकीनांचे लक्ष वेधणार्‍या दावडीचा लाडका फायनल सम्राट हरण्या बैलाचे (दि.15) रोजी निधन झाले. लहानपणापासून बैलगगाडा शर्यतींमध्ये प्रथम येणार्‍या या आपल्या लाडक्या बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज (दि.23) रोजी हरण्याचा दशक्रिया विधी घालून सातपुते कुटुंबीयांचे माणुसकीचे दर्शन घडले. दशक्रिया विधीसाठी ठिकठिकाणहून मोठ्या संख्येने बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.गणेश महाराज वाघमारे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
अंजन घालणारी घटना 
दरवर्षी 24 जानेवारीला ‘हरण्या’चा वाढदिवस सातपुते कुटुंबिय साजरा करत असत. मात्र दुर्दैवाने या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी दशक्रिया विधी करण्याची वेळ आली. बैलगाडा शर्यतीत हरण्याने नावलौकिक मिळविला होता. घाटात वेगवान धाव घेणार्‍या हरण्याने शर्यतीत दबदबा निर्माण केला होता. हरण्याचे अकरा लाख रूपये येत असताना राहुल सातपुते यांनी नकार दिला होता. अशा या हरण्या बैलाच नाव  ऐकल की डोळयापुढं चित्र उभे रहाते. हरण्या बैलाचा बंदुकीतुन गोळी सुटावी असा वेग होता. हरण्याने वयाच्या पहिल्या वर्षापासुन पुणे जिल्हा गाजवायला सुरुवात केली होती. बैलगाडा क्षेत्रात हरण्या चे नाव माहित नाही असा कोणी नसेलच. घाटात नाव ऐकल तरी सगळा घाट गच्च भरून जात असे. हरण्या व बबड्याची एक झलक बघायला बैलगाडा शौकीन वेडे होत असतं. बैलगाडा शर्यत बंदी ही न्यायालयीन बाब आहे. ज्या कोणाला वाटते शेतकर्‍यांकडून बैलांचा छळ होतो त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना आहे.