दावेदार असताना मुख्यमंत्री पदावरून डावलले : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे

भुसावळ/नशिराबाद : 40 वर्ष भाजपासाठी काम करून उभे आयुष्य खर्ची घातले मात्र मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो असतानाच आपल्याला डावलण्यात आले त्यामुळे हा माझ्यावर नव्हे तर खान्देशावर अन्याय असल्याची भावना माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी नशिराबाद येथे व्यक्त केली. मुख्यंत्री पदासाठी खान्देशावर कायम अन्याय झाला, कुणामुळे झाला हे सांगताना खडसे यांनी मी ‘टरबुज्या’ म्हणणार नाही मात्र माझ्या डोक्यावर आणून ठेवला’ असा रोपरोधिक टोला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. नशिराबाद येथे रेशन कार्ड वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

भाजपावर चालवले टिकेचे बाण
खडसे म्हणाले की, ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये 40 वर्ष हमाली केली आणि उभे आयुष्य पक्षासाठी घातले त्या पक्षाने आपल्यावर अन्याय केला. मुख्यमंत्री पदापर्यंत आपले नाव आले आणि वगळले गेले. मुख्यमंत्रीपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता. स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेले मात्र खान्देशावर अन्याय सुरूच आहे. 70 वर्षात कोकणात नारायण राणे, मनोहर जोशी असे तीन मुख्यमंत्री झाले तर विदर्भातील चार मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस झाला. मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त करीत भाजपात मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याला डावलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.