दिघी गावातील नागरिकांना नागरी सुविधांची प्रतिक्षा

0

सांस्कृतिक केंद्र, अभ्यासिका, वाचनालयाचा अभाव

दिघी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या महानगरांमध्ये अनेक विकासकामे झालेली आहेत. परंतु या महानगरांमध्ये काही भाग असेही आहेत, की जिथे मुलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागतो आहे. प्रत्येक नागरिकाला मुलभूत नागरी सुविधा मिळणे हा अधिकार असतो आणि त्या सुविधा पुरविणे हे सत्ताधीश, महापालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत यांचे कर्तव्य असते. असाच काही प्रकार पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या जवळ असणार्‍या दिघी परिसरामध्ये दिसून येतो आहे. वीस वर्षापूर्वीचे आरक्षण आजही तसेच आहे. आरक्षित जागेचा विकास न झाल्याने दिघीत आतापर्यंत सांस्कृतिक केंद्र, वाचनालयांचा अभाव आहे. येथील नागरिकांना एखादा छोटेखानी कार्यक्रम घेण्यासाठी देखील पालिकेच्या सभागृह उपलब्ध नाही.

ताबा नसल्याने विकास नाही
शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, वाचनालय, अभ्यासिका, सामाजिक संस्थाचे उपक्रम, जयंती, ज्येष्ठांचे कार्यक्रम, योगवर्ग, बालसंस्कार शिबिरे आणि पालिकेतर्फे महिलांसाठी राबविली जाणारी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिरे व अशा कित्येक कार्यक्रमांसाठी जागा व आवश्यक सुविधा मिळत नाहीत. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नवनगर विकास प्राधिकरणाने दिघीमध्ये दोन भूखंड सभागृहासाठी आरक्षित केले आहेत. आरक्षण क्रमांक 2/138 सर्व्हे क्रमांक वीसमध्ये 10 गुंठे व आरक्षण क्रमांक 2/118 सर्व्हे क्रमांक 82 मध्ये 10 गुंठे जागेवर आरक्षण आहे. मात्र, हे दोन्ही भूखंड पालिकेच्या ताब्यात आले नसल्याने दिघीतील आऱक्षण भागाचा विकास होऊ शकला नाही. महापालिकेने आरक्षित जागेवर तातडीने नियोजित विकास कामे करावीत अशी मागणी होत आहे.

भोसरीत यावे लागते
दिघी परिसरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र या दिघी गावाच्या जवळपास कोणतेही सभागृह नसल्याने स्नेहसंमेलनासाठी भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह किंवा सखुबाई गवळी उद्यानाजवळील महापालिकेच्या सभागृहाचा आधार घ्यावा लागतो. दिघीच्या वाढत्या परिसराबरोबर लोकसंख्या देखील झापाट्याने वाढते आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी कार्यक्रम होत असतात. परंतु, जागेच्या अभावाने ते इतरत्र जाऊन साजरे करावे लागतात.

परिसरात अभ्यासिका नाही
परिसरात शैक्षणिक संकुलांची वाढ होत आहे. त्यामुळे परगावावरून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. बहुसंख्य विद्यार्थी कॉट बेसिसवर राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण आवश्यक हवे असते. दिघीत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नसल्याने त्यांना मिळेल तिथे अभ्यास करावा लागतो. विद्यार्थ्यांची कुचंबणा होते आणि याचा अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे अभ्यासिकेची देखील मागणी होत आहे.

सर्व पार्किंगमध्ये कार्यक्रम
दिघीत काही कार्यक्रम करायचा झाल्यास खासगी मंगल कार्यालय किंवा सभागृहाचे भाडे परवडणारे नाहीत. सर्वच संस्थांना भोसरीपर्यंत येऊन पालिकेची सभागृहे मिळवणेही शक्य नसते. त्यामुळे काही इमारतीच्या पार्किंगमध्येच समारंभ उरकून घेतले जातात. काही नागरीक रस्त्यात मंडप घालून सोहळे साजरे करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. दिघीत सुविधापूर्ण सभागृह बांधल्यास त्याचा नागरिकांना फायदा होईल. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाला चालना मिळेल. स्थानिकांना सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. शाळा महाविद्यालयांना हक्काचे सांस्कृतिक केंद्र मिळेल. यातून कलाकार घडण्यास मदत होईल, असे स्थानिक नागरीक सांगतात.