यावल वनविभागाच्या गस्ती पथकाची निमड्या गावाजवळ कारवाई ; 505 किलो डिंकासह चारचाकी वाहन जप्त
यावल– निमड्या गावाकडून जाणार्या एका वाहनात बेकायदेशीररीत्या डिंकाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर यावल वनविभागाच्या गस्ती पथकाने गुरुवारी वाहनाचा पाठलाग करून दोन आरोपींना अटक केली तर दिड लाख रुपये किंमतीचा व 505 किलो वजनाचा धावडा डिंक जप्त करण्यात आला. अवैधरीत्या डिंकाची वाहतूक करणार्या फिरोज अकबर तडवी व आरीफ सलीम तडवी (दोन्ही रा. निमड्या, ता.रावेर) यांना अटक करण्यात आली. वाहन चालकासह मालकाकडे डिंक वाहतुकीचा कुठलाही परवाना न आढळल्याने वाहन (क्र.एम.पी.20 एच.ए.0443) जप्त करण्यात आले.
कारवाईत यांचा सहभाग
यावल गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनरक्षक एस.एस.माळी, वनरक्षक जे.व्ही.ठाकरे, एस.टी.पंडीत, वाहनचालक वाय.डी.तेली, निमड्या वनरक्षक ममता पाटील, पाल वनरक्षक वैशाली कुवर आदींनी ही कारवाई केली.