दिनेश दीक्षित यांच्या ‘वेगळी वाट’ पुस्तकाचे प्रकाशन

0

चांगल्या कामांना सगळ्यांचे सहकार्य मिळते – डॉ रामचंद्र गोडबोले

जळगाव : आम्ही दंतेवाडीत लहान मुलांसाठी आरोग्य आणि शिक्षणाबाबत गेल्या ३५ वर्षांपासून कार्य करत आहोत. चांगल्या कामाला सर्वांचे सहकार्य लाभत असते. ‘वेगळी वाट’ या पुस्तकात त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे दर्शन घडले याचा आनंद आहे, असे मत डॉ. रामचंद्र गोडबोले यांनी व्यक्त केले. जैन हिल्स येथे बडी हांडा सभागृहात जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी दिनेश दीक्षित यांच्या ‘वेगळी वाट’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन होते.

मुळचे महाराष्ट्रातील परंतु छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडातील बारसूर या भागात आदिवासींच्या विकासासाठी सौ सुनिता व डॉ. रामचंद्र गोडबोले काम करत आहेत. स्थानिक आदिवासी मंडळीसाठी डॉ. गोडबोले दाम्पत्य भय्या आणि भाभी झाले आहेत. व्यासपीठावर डॉ. रामचंद्र गोडबोले, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी, पत्रकार आणि जैन इरिगेशनचे प्रसिद्धी विभागाचे सहकारी दिनेश दीक्षित हे उपस्थित होते. दिनेश दीक्षित ‘वेगळी वाट’ पुस्तकाच्या निर्मितीबाबत आपल्या प्रस्तावनेत म्हणाले की, हे सदर सुरू करताना मला कुणाकडे जावं लागलं नाही. दिवाळीला जसे एका पणतीवरून दुसरी पणती आपण प्रज्ज्वलीत करतो… या सदराचं तसं झालं. एका कडून दुसऱ्याचं नाव, दुसऱ्याकडुन तिसऱ्याचं नाव कळत गेलं आणि ही वेगळी वाट निर्माण झाली.… सामाजिक जाणीव ठेवून अतिशय मनापासून काम करणारी ही सारी मंडळी आहे आणि त्यांना एकत्र आणण्यात माझा खारीचा वाटा ठरला याचा मला अभिमान वाटतो असे ते म्हणाले.

ज्यांच्या हातून पुस्तकाचं प्रकाशन झाले ते सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामचंद्र गोडबोले यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, आमच्या कार्यक्षेत्राच्या दुर्गम परिसरात जैन सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, पंप मी पाहिले आहेत. या परिसरात कृषी विषयक, सौर ऊर्जेविषयक कार्य चालते ते बघण्याचे सौभाग्य मिळाले, अशोक जैन यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली ही आनंददायी बाब आहे. नक्षलवादी दुर्गम भागात आम्ही दोघं काम करत असतो. आता लहान मुलांच्या आरोग्यासाठी विशेषतः गुटखा खाणे, अनिमिया अन्य आरोग्याबाबत काम करण्यात लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगून आदिवासींच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपणही आपला वेळं, द्यावा त्यांना प्रशिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, “रूप पालटू वसुंधरेचे, सार्थक करूया जन्माचे” या नुसार आपणं अंधारात जितक्या पणत्या लावता येतील तेवढ्या लावायच्या आणि परिसर उजळून टाकायचा. या ठिकाणी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी वेगळी वाट चोखाळली आहे. ही वेगळीवाट पुढल्या पिढीनेही अवलंबावी यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे सांगून दीक्षित यांच्या पुस्तकाबद्दल अभिनंदन केले. जे वेगळ्या वाटेने गेले अशा वेगळ्या वाटेवरच्या पुस्तकातील व्यक्तींपैकी अव्दैत दंडवते आणि राजेश ठोंबरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जैन इरिगेशनचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. कार्यक्रमास वेगळी वाट चोखाळणारे व त्यांच्या परिवारातील सदस्य तसे जैन इरिगेशनचे सहकारी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन
व्यासपीठावरील बॅकड्रॉपवर ग्रामीण भागातील भिंतींचा देखावा साकारण्यात आला आहे. या भिंतीत छोट्या कोनाड्यात, देवळी तयार करण्यात आली असून आतमध्ये तेवणाऱ्या समईचे चित्र आहे. या कोनाड्यावर सरस्वतीचे चित्र असलेला पडदा असून आतमध्ये पुस्तके ठेवलेली होती. पडदा बाजुला सारून पुस्तकांचे आगळे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन करण्यात आले.