दिरंगाई केल्यास हयगय नाही

0

जळगाव। शासनातर्फे अनेक महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यत पोहोचाव्यात यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असून शासकीय कामकाजात दिरंगाई केल्यास हयगय करणार नाही अशा शब्दात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अधिकार्‍यांना आढावा बैठकीत खडसावले. शुक्रवारी 16 रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याभरातून बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे तक्रार असल्याने निकृष्ट कामगिरी करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला. 2015-16 मधील बांधकाम विभागाचे कामे जवळपास पूर्ण झाले असून 2016-17 चे कामे पूर्ण करण्यासाठी मार्चची मुदत असली तरी हे कामे डिसेंबर पर्यतच करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

काम दर्जेदार व मुदतीत करा
बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे अनेक तक्रारी येतात. तसेच मक्तेदारांकडून बांधकाम केले जात असल्याने अनेकदा मक्तेदारांकडून दर्जाहीन काम केले जाते. अशी कामे लवकर खराब होतात त्यावर वारंवार खर्च करण्यापेक्षा काम एकदाच दर्जेदार व विहीत मुदतीत करावे असे आदेश सीईओंनी दिले. मुदतीत काम न पून्हा झाल्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची वेळ येईल ही वेळ येऊ येणार नाही याची काळजी घेण्याचे सांगितले.

बोटे यांना चौकशीचे आदेश
जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, पारोळा तालुक्यातील मनरेगा अंतर्गत जवाहर विहीर योजनेचे कामे करण्यात आले. 122 लाभार्थ्यांनी स्वःखर्चाने विहीरीचे काम केले मात्र शासनातर्फे त्यांना अनुदान देण्यात आले नाही. याबाबत लाभार्थ्यांनी सीईओंकडे तक्रार केली होती. संबंधीत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी तत्कालीन ग्रामपंचायत उपमुख्यकार्यकारी अधिकारी मिनल कुटे यांना दिले होते. कुटे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आलेल्या बी.ए.बोटे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून विहीरीचे कामे केले होते. शेतकर्‍यांचे अनुदान थांबविण्यात आल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सीईओं कार्यालयात येत चौकशी करण्याचे निवेदन दिले होते.

विभाग निहाय आढावा
निवडणुकीमुळे तसेच विविध कारणांमुळे जिल्हा परिषदेचे अनेक कामे रखडले होते. नवीन कार्यकारीणी जाहीर झाल्यानंतर या कामांना वेग आले असून सीईओ दिवेगावकर यांनी या आठवड्यात सर्व विभागांचा विभाग निहाय आढावा घेतला आहे. आढावा घेऊन कामांची सद्यस्थिती जाणून घेत अपूर्ण कामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दर महिन्यात विभाग निहाय आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.