मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते दिलीपकुमार यांची बुधवारी रात्री उशीरा प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता कक्षात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. लघवीमार्गात सूज आणि अशक्तपणा यामुळे ते सद्या ग्रस्त आहेत. वैद्यकीय सूत्राच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरात क्रिएटिनीनचे प्रमाण वाढले असून, मूत्रपिंड खराब झालेले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगरानीखाली उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी तथा ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी मात्र दिलीपकुमार यांची प्रकृती खराब असली तरी स्थीर असल्याची माहिती दिली आहे.
प्रकृती चिंताजनक
लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात असलेल्या दिलीपकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मात्र काही वृत्तवाहिन्यांनी दिवसभर दिली होती. त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या असून, मूत्रपिंडाने काम थांबविल्याने व औषधोपचारास शरीर साथ देत नसल्याने डॉक्टरांची चिंता वाढली होती. 94 वर्षीय दिलीपकुमार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आजारी आहेत. सद्या ते अतिवदक्षता कक्षात असले तरी वृत्तलिहिपर्यंत त्यांना जीवरक्षा प्रणालीवर अथवा कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेले नव्हते. डिसेंबरमध्येही त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप तसेच डाव्या पायाला आलेली सूज यामुळे ते परेशान झाले होते. त्या काळात त्यांच्या निधनाच्या अफवाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे सायरा बानो यांना ट्वीटरद्वारे त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती द्यावी लागली होती.
बॉलीवूड गाजविले
बॉलीवूडमधील ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीपकुमार यांची ओळख आहे. त्यांचे मूळनाव युसुफ खान असे आहे. परंतु, दिलीपकुमार या हिंदू नावानेच ते आयुष्यभर जगले, आपली चित्रपट क्षेत्रात कारकीर्द गाजवली. देवदास, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, नया दौर आणि मधुमती या चित्रपटांनी त्यांना उदंड लोकप्रियता मिळाली होती. 1998 मध्ये आलेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके या चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर 2005 मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्म विभूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.