मुंबई : बॉलिवूडमधील अभिनयाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सध्या लिलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांना मूत्रपिंडासंबंधीचा आजार जडला आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अतिदक्षता विभागात स्थलांतरित करण्यात आले. त्यांना सध्या सलायनच्या माध्यमातून औषधे दिली जात आहेत. तसेच त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
अपचन होत असल्याने दाखल करण्यात आले
त्यांना अपचन होत असल्याच्या तक्रारीवरून रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा त्यांना हा आजार असल्याचे समोर आले असल्याचे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता केवळ अपचन होणे हाच त्यांच्या प्रकृतीतील मुख्य भाग आहे. त्याचाही परिणाम मूत्रपिंडावर होत असतो. मूत्रपिंडासंबंधीच्या तक्रारी समोर आल्या आहेत, त्यात काहीच सुधारणा होतांना दिसत नाही, असेही डॉक्टरांनी नमुद केले आहे.
मागील वर्षांपासून असतात आजारी
94 वर्षांचे दिलीप कुमार नुकतेच वैद्यकीय तक्रारींना सामोरे गेले होते. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिसेंबरमध्ये त्यांना पुन्हा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी 65 चित्रपटांमधून अभिनय केला असून देवदास, मुघल-ए-आझम, गंगा जमुना, क्रांती, कर्मा ही त्यातील काही चित्रपट यादगार ठरले आहे. 1991 साली त्यांना पद्मभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर 1994 साली त्यांना दादासाहेब फाळके अॅरवॉर्डने गौरविण्यात आले होते. त्यानंतर 2015 साली त्यांना पद् विभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.