दिलीप बराटे यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील गटनेतेपदी तथा विरोधी पक्षनेतेपदी दिलीप बराटे यांची निवड करण्यात आली. तसेच ही निवड एक वर्षांसाठीच असणार आहे. यापुढे दरवर्षी नेतेपद बदलणार असल्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षी या पदावर महिला नगरसेविकेची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.

तुपे यांची तीन महिन्यांपूर्वी पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले महापालिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेतेपद अन्य नगरसेवकाकडे सोपवले जाणार, यासाठी हालचाली सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये गटनेतेपदी इच्छुक नगरसेवकांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे, नंदा लोणकर, महेंद्र पठारे आणि गफूर पठाण यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर चर्चा करून यापुढील तीन वर्षे तीन सदस्यांना प्रत्येकी एक वर्षे गटनेते पदी संधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. इच्छुकांची नावे प्रदेशच्या नेत्यांना पाठविण्यात आली. त्यांनी बराटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सर्व नगरसेवकांनी आणि पदाधिकार्‍यांनी बराटे यांच्या नावाला अनुमोदन दिले. पुढील वर्षी नोव्हेंबर मध्ये पुन्हा पक्षाची बैठक घेऊन गटनेत्याची निवड केली जाईल.