दिल्लीतील राजकारण तापणार : आता राजघाटावर खुद्द पंतप्रधान मोदीच करणार उपोषण

0

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह देशभरातील भाजपचे सर्व खासदार उपस्थित राहणार

नवी दिल्ली । विरोधक गदारोळ घालून सातत्याने संसदेची कोंडी करत असून वारंवार कामकाजात खोळंबा घालण्याच्या निषेधार्थ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 एप्रिल रोजी दिल्लीतील राजघाटावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशभरातील भाजपचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत.
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेले. ही बाब देशातील जनतेपुढे नेण्यासाठी तसेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून घातल्या जाणार्‍या गदारोळाचा विरोध करण्यासाठीच हे उपोषण आंदोलन असल्याचे भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी राजघाटावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार उपोषण करणार असल्याने दिल्लीतील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.