नवी दिल्ली : दिल्लीमधील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आता शनिवारी (24 नोव्हेंबर) रोजी देखील ब्रिजवर एक अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
गाझियाबादचा रहिवासी असलेला शंकर (24) आणि त्याचा मित्र दीपक (17) सिग्नेचर ब्रिजवरून जात असताना बाईक घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यामध्ये शंकरचा मृत्यू झाला असून दीपक जखमी झाला आहे.
सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. ब्रिजवर सेल्फीच्या नादात दोन तरुणांचा पुलावरुन कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. बाईकस्वार ब्रिजवरुन जात असताना सेल्फी घेत होते. बाईक चालवताना सेल्फी घेणं दोघांनाही महागात पडलं. सेल्फी घेत असताना त्यांची बाईकने दुभाजकाला धडक दिली आणि दोघंही वाहनासहीत पुलावरुन खाली कोसळले. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच या पुलाचं लोकार्पण करण्यातआलं होतं.